सातारा : ज्यांच्याकडे पाणी मागितले त्यांच्या तोंडचे पाणी पळण्याची वेळ : पूनम महाजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2018 02:18 PM2018-02-24T14:18:10+5:302018-02-24T14:18:10+5:30
दुष्काळी तालुक्यातील पाणीप्रश्न कायमस्वरुपी सोडविण्यासाठी राज्य सरकारने जास्तीत जास्त निधी दिला. गेली अनेक वर्षे ज्यांना पाणी मागितले आता त्यांच्या तोंडचे पाणी पळवण्याची ताकद आपल्या हातात आली आहे, असे आवाहन येथील दुष्काळी जनतेला भारतीय जनता युवा मोचार्चे राष्ट्रीय अध्यक्षा खासदार पूनम महाजन यांनी केले.
म्हसवड : दुष्काळी तालुक्यातील पाणीप्रश्न कायमस्वरुपी सोडविण्यासाठी राज्य सरकारने जास्तीत जास्त निधी दिला. गेली अनेक वर्षे ज्यांना पाणी मागितले आता त्यांच्या तोंडचे पाणी पळवण्याची ताकद आपल्या हातात आली आहे, असे आवाहन येथील दुष्काळी जनतेला भारतीय जनता युवा मोचार्चे राष्ट्रीय अध्यक्षा खासदार पूनम महाजन यांनी केले.
भारतीय जनता पक्षाच्या वतीने म्हसवड येथील बाजार पटांगणावर झालेल्या युवा संवाद यात्रेच्या जाहीर सभेत त्या बोलत होत्या. यावेळी भारतीय जनता युवा मोचार्चे प्रदेशाध्यक्ष आमदार योगेश टिळेकर, महाराष्ट्र प्रभारी अतुल कुमारजी, राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर, प्रदेश सहप्रभारी अलोक देगस, सहप्रभारी भावेशजी, भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, जिल्हा उपाध्यक्ष व निमंत्रक अनिल देसाई, माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर, तालुकाध्यक्ष बाळासाहेब मासाळ, प्रा. विश्वंभर बाबर, अण्णासाहेब टाकणे उपस्थित होते.
महाजन म्हणाल्या, या विधानसभा मतदार संघातील लोकांनी नेहमीच हाताची व घड्याळाची दोस्ती केली आहे. तरीही कित्येक वर्षे येथील गावांना, शेतीला पाणी मिळू शकले नाही. चूल फुंकून-फुंकून बेजार झालेल्या येथील महिलांना गॅस मिळाला नाही. भाजपची सत्ता येताच देशातील साडेतीन कोटी गॅस सिलिंडर घराघरातील महिलांना मोफत दिला. शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबविण्यात केंद्रीय अर्थसंकत्पात प्रथमत: ऐतिहासिक अशी भरीव तरतूद केलेली आहे.
सर्व धर्म समभाव म्हणता तर मग अजूनही तुमचे कार्यकर्ते जिथं गाव पेटतं तिथं रॉकेल ओतायला का जाताहेत? असा प्रतिप्रश्नही उपस्थित करून महाजन म्हणाल्या, आम्ही कर्जमाफी गरीब छोट्या शेतकऱ्यांची केली. ती मोठ्या धेंडांना मिळाली नाही म्हणून कर्जमाफीवर प्रश्न उपस्थित केला जात आहे. मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी माण-खटावमधील रखडलेल्या पाणीपुरवठा योजना पूर्ण करण्यासाठी नऊशे कोटींचा निधी मंजूर आहे.
अनिल देसाई म्हणाले, भाजपने केंद्र व राज्यातून दिलेल्या निधीतून माण तालुक्याच्या पूर्व भागातील वरकुटे-मलवडी परिसरातील सोळा गावांचा पाणी प्रश्न कायमस्वरुपी सुटण्यासाठी नऊ कोटींचा निधी दिला. माणगंगा व येरळा नदी बारमाही वाहती करण्यासाठी आठशे कोटींचा निधी दिला आहे. माण तालुक्यात दोन राज्यमागार्ची कामे सुरू झाली आहेत.
आमदार योगेश टिळेकर यांचेही भाषण झाले