सातारा : टोल नाका चालविणाऱ्या खंडणीबहाद्दरांनी शेतकऱ्यांना देशोधडीला लावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2018 06:32 PM2018-04-24T18:32:41+5:302018-04-24T18:32:41+5:30
नेहमीच कुचकामी ठरलेल्यांना निवडणूक आली की, वेळ मारून नेण्यासाठी हे नाही केले तर, मिशा काढीन. ते नाही केले तर, भुवया काढीन अशी डायलॉगबाजी करावी लागली आहे. एक खंडणी मागणे, दुसरे टोल नाका चालवणे आणि तिसरे गोरगरीब शेतकऱ्यांच्या जमिनीवर शिक्के मारून त्यांना देशोधडीला लावणे यासारखी विकासकामे आमच्या हातून झाली नाहीत आणि होणारही नाहीत,ह्ण असा घणाघात आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी कोणाचेही नाव न घेता केला.
सातारा : नेहमीच कुचकामी ठरलेल्यांना निवडणूक आली की, वेळ मारून नेण्यासाठी हे नाही केले तर, मिशा काढीन. ते नाही केले तर, भुवया काढीन अशी डायलॉगबाजी करावी लागली आहे. एक खंडणी मागणे, दुसरे टोल नाका चालवणे आणि तिसरे गोरगरीब शेतकऱ्यांच्या जमिनीवर शिक्के मारून त्यांना देशोधडीला लावणे यासारखी विकासकामे आमच्या हातून झाली नाहीत आणि होणारही नाहीत,ह्ण असा घणाघात आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी कोणाचेही नाव न घेता केला.
राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी सोमवारी साताऱ्यात आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यावर टीका केली होती, या पार्श्वभूमीवर प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी म्हटले आहे की, ह्य४० वर्षे आमच्याकडे सत्ता होती. सत्ता सातारकरांनी, जनतेनं आम्हाला दिली आणि तुम्हाला का घरी बसवले होते? याचेही आत्मपरीक्षण करा.
शेवटी सत्तेत येण्यासाठी कोणाच्या मदतीचा हात हातात घ्यावा लागला, याचेही आत्मपरीक्षण त्यांनी केले पाहिजे. ४० वर्षांत भाऊसाहेब महाराज आणि त्यांच्यानंतर मी काय केले, हे तमाम जनतेला माहिती आहे. त्यामुळेच आम्हाला सत्ता मिळाली, हे आम्ही कदापिही विसरत नाही. गेली १०-१५ वर्षे लोकप्रतिनिधी म्हणून मिरवताना ज्या भागाचे लोकप्रतिनिधी आहोत, त्या भागात आपण काय दिवे लावले? याचीही कबुली आपण दिली पाहिजे. केवळ घोकमपट्टी करून आणि थापेबाजी करून विकासकामे होत नसतात.
टीका, शंखध्वनीला फारशी अक्कल लागत नाही, त्याचप्रमाणे थापा मारायलाही फारशी अक्कल लागत नाही, हे साताऱ्यातीलच काही लोकप्रतिनिधींमुळे खरे ठरले आहे. स्वत:चे गुण स्वत:चं जाहीर केले ते बरे झाले. चुना, तंबाखू, सिगारेट, गुटखा, दारू या कोणाच्या आवडीच्या गोष्टी आहेत, हे सातारकरच नाही तर सबंध महाराष्ट्राला माहिती आहे. त्यामुळे शंखध्वनी कोण मारतो, हेही सगळ्यांना कळून चुकले आहे.
निवडून आल्यानंतर गेल्या १०- १५ वर्षांत किती विकासकामे मंजूर केली आणि किती पूर्णत्वास नेली, हा संशोधनाचा भाग आहे. किमान मी बोलल्यामुळे तरी, अशांना आपणही काहीतरी काम करून दाखवले पाहिजे, याची किमान जाणीव तरी झाली. हेही नसे थोडके, असे खेदाने म्हणावे लागेल.
आता निवडणुका तोंडावर आल्या की हातात नारळ घेऊन दुसऱ्यांनी मंजूर केलेल्या कामांचा प्रारंभ करायचा आणि लोकांचा बुद्धिभेद करण्यासाठी दुसऱ्यांना नावे ठेवायची, हा नवीन धंदा सुरू केला आहे. अशांनी इंजिनिअरने लिहिलेली कामाची यादी वाचून दाखवायची आणि ही कामे मीच केली, असा ढोल बडवायचा. स्वत: काही करायचे नाही; पण दुसऱ्याने मंजूर केलेल्या कामाच्या कोनशीलेवर माझे नाव लागले पाहिजे, हा अट्टाहास पूर्ण करण्यासाठी वाट्टेल ते करायचे. कामासाठी नाही तर फक्त नावासाठी लोकप्रतिनिधी म्हणून मिरवायचे आणि दुसºयाला शहाणपण शिकवायचे, हे आता थांबले पाहिजे, असेही या पत्रकात म्हटले आहे.
सांगता येईल असे एखादे तरी काम करा...
नुसतीच बडबड आणि बोलबच्चनगिरी करण्यापेक्षा किमान लोकांना सांगता येईल, असे एखादे तरी काम करा. तेच-तेच गोल फिरवून फिरवून आता त्याचे वाटोळे झाले आहे. त्यामुळे फुका बाता मारण्यापेक्षा स्वत: काहीतरी करून दाखवा आणि मग बढाया मारा, असा उपरोधिक टोलाही आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी लगावला आहे.
लोकांना किती भूलविणार...
तीन-चार वर्षांपूर्वी पालिकेतल्याच एका विद्वान वकिलाने साताऱ्यात पासपोर्ट आॅफिस येणार, अशी बातमी देऊन मोठी दवंडी पिटली होती. पासपोर्ट आॅफिस साताऱ्यांत आले पाहिजे. लोकांना सुविधा मिळालीच पाहिजे. चार वर्षे झाले तरी पासपोर्ट आॅफिस काय साताऱ्यात आले नाही; पण आता नव्याने हे आॅफिस साताऱ्यात येणार, अशी पुन्हा बातमी तरी आली. पासपोर्ट आॅफिस, रेल्वे आॅफिस, विमानतळ अरे किती गाजरे दाखवणार आणि जनतेला भूलविणार, असा सवालही आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी केला आहे.