सातारा : टोमॅटो बागांचा खर्च बळीराजाच्या अंगावर, लाल पिकाचे दर गडगडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2018 01:49 PM2018-10-09T13:49:59+5:302018-10-09T13:54:28+5:30
कवडीमोल किमतीने विकले जात असल्याने खटाव तालुक्यात बहुतांश शेतकऱ्यांनी टोमॅटो न तोडताच तशाच बाग ठिकठिकाणी उभ्या असलेल्या पाहायला मिळत आहेत.
खटाव (सातारा) : शेतकऱ्यांच्या कोणत्याच शेतीमालाला योग्य दर मिळत नसल्यामुळे शेती व्यवसाय अडचणीत येत आहे. त्यातच खटाव तालुक्यात बहुतांश शेतकऱ्यांनी टोमॅटोच्या बागा केल्या आहेत. परंतु सध्या बाजारपेठेत टोमॅटो कवडीमोल किमतीने विकले जात असल्याने शेतकऱ्यांनी याकरिता घातलेला खर्च तर सोडाच, या बागांचा खर्च त्यांच्या अंगावर पडला आहे. त्यामुळे टोमॅटो न तोडताच तशाच बाग ठिकठिकाणी उभ्या असलेल्या पाहायला मिळत आहेत.
टोमॅटोचा वापर सर्रास स्वयंपाक घरामध्ये होत असतो. या लाल पिकाला बाजारात मिळत असलेल्या दरामुळे शेतकरी हैराण झाला आहे. त्याचबरोबर या बागामध्ये तोडणीकरिता मजूर लावून अधिकच घाट्यात जाणार आहेत. त्यामुळे टोमॅटो न तोडता तशाच या बागा उभ्या असल्याचे ठिकठिकाणी दिसून येत आहे.
सध्या किरकोळ बाजारात याला दहा रुपये किलोचा दर मिळत आहे. या मिळणाऱ्या दरातून टोमॅटोच्या बागा उभ्या करताना लागणाऱ्या रोपापासून इतर साहित्याचा होणारा खर्च वजा करता शेतकऱ्याच्या हाती काहीच शिल्लक राहत नाही. त्यामुळे शेतकऱ्यानी टोमॅटो न तोडता तशाच ठेवल्यामुळे या बागामध्ये टोमॅटोचा खच पडलेला पाहावयास मिळत आहे.
ज्या पिकातून काही आर्थिक उत्पन्न मिळेल, या आशेवर टोमॅटोच्या पिकाकडे वळलेला शेतकरी आता आर्थिक संकटात आला आहे. बाजारात सध्या याला मिळणारा दर आणि या पिकासाठी होत असलेला लागणीपासून तोडणीपर्यंत होणारा खर्च यांचा कुठेच ताळमेळ बसत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.