सातारा : त्या विद्यार्थ्यांसाठी तब्बल १८६ किलोचा स्नोमॅन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2018 11:05 PM2018-12-25T23:05:50+5:302018-12-25T23:09:33+5:30
विशेष मुलांनाही ख्रिसमस सणाचा भाग बनता यावे, या उद्देशाने पाचवड येथील आपुलकी मतिमंद मुलांच्या विद्यार्थ्यांसाठी लिम्का बुक आॅफ रेकॉर्डसमध्ये दाखल होण्यासाठी १८६ किलो केक स्नोमॅनची निर्मिती
सातारा : विशेष मुलांनाही ख्रिसमस सणाचा भाग बनता यावे, या उद्देशाने पाचवड येथील आपुलकी मतिमंद मुलांच्या विद्यार्थ्यांसाठी लिम्का बुक आॅफ रेकॉर्डसमध्ये दाखल होण्यासाठी १८६ किलो केक स्नोमॅनची निर्मिती करण्यात आली. दान स्वरुपात मिळालेल्या केक, चॉकलेट आणि जॅम अन् सॉसच्या माध्यमातून हा ‘स्नोमॅन’ साकारण्यात आला.
पाचवड येथील आपुलकी मतिमंद शाळेतील मुलांबरोबर ख्रिसमस साजरा करण्याची कल्पना अवघ्या पाच दिवसांपूर्वी सोल डिटॉक्स टीमच्या रचना पाटील यांना सुचली. त्यानंतर त्यांनी ही कल्पना आपल्या सहकाऱ्यांपुढे मांडली आणि पुढे सोशल मीडियाद्वारे मदतीची साद घालण्यात आली. त्यानंतर समाजातून दान स्वरुपात केक, चॉकलेट, जेम्स, सॉस आणि जॅम या वस्तू भेट स्वरुपात स्वीकारल्या जातील, असे आवाहन करण्यात आले होते.
या आवाहनाला प्रतिसाद देत कºहाड, मुंबई, विंग, सातारा, कोल्हापूर, बेंगलोर, पुणे येथून केक दान स्वरुपात मिळाले. यात कºहाडच्या प्रशांत पाचुपते आणि सुमन पाचपुते यांनी प्रत्येकी पाच किलो, मुंबईच्या स्वाती यादव यांनी दोन किलो, विंगच्या सचिन कणसे यांनी २ किलो, कोल्हापूरच्या दीपाली जाधव यांनी ३ किलो, बेंगलोरच्या मीना सोलंकी यांनी २ किलो, पुण्याच्या रुपाली सणस यांनी २ किलो, कºहाडच्या अक्षय कदम यांनी २ किलो केक उपलब्ध करून दिला. सोल डिटॉक्स टीमकडेही ज्ञात-अज्ञात अनेकांनी केक, जेम्सच्या गोळ्या जॅम, बिस्कीट, चॉकलेट सॉस आदी वस्तू भेट स्वरुपात उपलब्ध झाल्या.
पाचवड येथे सकाळी नऊ वाजता डोक्यात टोपी आणि हातात मोजे घालून स्नोमॅन तयार करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. शेफ सर्व्हेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली तब्बल सव्वातीन तासांनंतर हा स्नोमॅन आकाराला आला. र्ईट आऊट अॅट टपरी या चळवळीबरोबर काम करणारे शेफ सर्व्हेश जाधव यांनी स्नॉमॅनची निर्मिती केली. यासाठी त्यांना आपुलकी शाळेच्या सुषमा पवार, सरपंच लतिका शेवाळे, सनबीमचे सारंग पाटील यांच्यासह सोल डिटॉक्स टीमच्या रचना पाटील, भाग्यश्री ढाणे, जयश्री शेलार, तेजश्री जाधव, शीतल आहेरराव, ज्योती ठक्कर, रुपाली देशमुख, अॅड. धनश्री कदम यांची साथ मिळाली.
‘स्नोमॅन’ आपुलकीत !
पाचवड येथे तयार करण्यात आलेला हा स्नोमॅन ‘आपुलकी’ शाळेत मुक्कामी आहे. हा केक फ्रिजशिवाय साधारण चार दिवस टिकणारा आहे. त्यामुळे शाळेतील मुलांबरोबर गावातील आणि परिसरातील चिमुरडी हा केक खाण्याचा मनसोक्त आनंद घेऊ शकणार आहेत. पुढील चार दिवस हा केक खाण्याचा उत्सवच जणू आपुलकीत रंगणार आहे.
135 मुलं 48 स्वयंसेवक
186 किलोचा स्नोमॅन 3.15 मिनिटांचा वेळ
साताºयाचा हा माझा पहिलाच अनुभव. इथं कोणी मला ओळखणारा नाही, या विचारापासून नव्या ठिकाणी मी सर्वांना घेऊन काम कसं करणार, असे अनेक प्रश्न मनात होते; पण पाचवडमध्ये पोहोचल्यानंतर झालेल्या स्वागताने मी थक्क झालो. सातारकरांच्या उत्तम नियोजनामुळे आम्ही हा विक्रम करू शकलो.
- सर्व्हेश जाधव, शेफ, इट आऊट अॅट टपरी, पुणे.