सातारा : नगरसेवकाच्या त्रासाला कंटाळून, घंटागाडी चालकाचा आत्महत्येचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2018 12:18 PM2018-08-04T12:18:25+5:302018-08-04T12:20:48+5:30
सातारा पालिकेतील एका घंटागाडी चालकाने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ज्ञानेश्वर शेलार असे घंटागाडी चालकाचे नाव असून, त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सातारा विकास आघाडीचे नगरसेवक विशाल जाधव यांच्या त्रासाला कंटाळून त्यांनी हे कृत्य केल्याचा आरोप शेलार यांच्या कुटुंबीयांनी पोलिसांकडे केला आहे.
सातारा : सातारा पालिकेतील एका घंटागाडी चालकाने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ज्ञानेश्वर शेलार असे घंटागाडी चालकाचे नाव असून, त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सातारा विकास आघाडीचे नगरसेवक विशाल जाधव यांच्या त्रासाला कंटाळून त्यांनी हे कृत्य केल्याचा आरोप शेलार यांच्या कुटुंबीयांनी पोलिसांकडे केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, ज्ञानेश्वर शेलार यांनी कर्ज काढून घंटागाडी खरेदी केली आहे. ही घंटागाडी सदर बझार परिसरातील कचरा उचलण्याचे काम करते. दरम्यान, काही दिवसांपूर्वी ही घंटागाडी अचानक बंद करण्यात आली. या पाठीमागे नगरसेवक विशाल जाधव यांचा हात असल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबाने केला आहे.
घंटागाडी अचानक बंद झाल्याने त्यात भाड्याच्या घरात राहून कर्ज कसे फेडायचे, असा प्रश्न ज्ञानेश्वर शेलार यांच्यापुढे उभा राहिला. त्यामुळे ते गेल्या दोन-तीन दिवसांपासून मानसिक तणावाखाली वावरत होते. त्यात
नगरसेवक जाधव हे शेलार यांच्याकडे महिन्याला हप्ता देण्याची मागणी करीत होते, असा आरोप शेलार यांच्या कुटुंबीयांनी केला आहे.
याच कारणातून त्यांनी शुक्रवारी रात्री राहत्या घरात विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. या घटनेनंतर कुटुंबीयांनी तातडीने त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या घटनेची अद्याप शहर पोलीस ठाण्यात नोंद झाली नव्हती.