सातारा : कडेगाव-वांगीच्या अपघातात कऱ्हाडने गमावले दोन मल्ल, कुस्ती क्षेत्रावर शोककळा, तालुक्यात हळहळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2018 12:30 PM2018-01-13T12:30:13+5:302018-01-13T12:38:41+5:30
कुस्ती आणि कऱ्हाडचं जवळचं नातं; पण आज या कुस्तीक्षेत्राला अनपेक्षित धक्का बसला. कडेगाव-वांगी येथे झालेल्या अपघातात कऱ्हाड तालुक्यातील दोन मल्लांचा दुर्दैवी मृत्यू झाला. कुस्तीत तालुक्यासह जिल्ह्याला नावलौकिक मिळवून देण्यासाठी मातीत खेळणारे दोन तरुण हकनाक गेले. त्यामुळे कुस्ती क्षेत्रासह तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.
कऱ्हाड : कुस्ती आणि कऱ्हाडचं जवळचं नातं; पण आज या कुस्तीक्षेत्राला अनपेक्षित धक्का बसला. कडेगाव-वांगी येथे झालेल्या अपघातात कऱ्हाड तालुक्यातील दोन मल्लांचा दुर्दैवी मृत्यू झाला. कुस्तीत तालुक्यासह जिल्ह्याला नावलौकिक मिळवून देण्यासाठी मातीत खेळणारे दोन तरुण हकनाक गेले. त्यामुळे कुस्ती क्षेत्रासह तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.
कऱ्हाड तालुक्यातील काले येथील आकाश देसाई आणि मालखेड येथील सौरभ माने या दोन युवा मल्लांचा वांगी येथील अपघातात मृत्यू झाला. काले येथील आकाश याची शरीरयष्टी भारदस्त होती.
त्यामुळे साहजिकच कुस्ती क्षेत्रात त्याला मानाचे स्थान मिळाले होते. त्याच्या घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. वडील दादासाहेब देसाई हे वडिलोपर्जित शेती करतात. तर गत काही महिन्यांपासून त्यांनी भाजीपाल्याचा व्यापार सुरू केला आहे.
शेती आणि व्यापारातून मिळणाऱ्या उत्पन्नापैकी बहुतांश पैसे ते आकाशसाठी खर्च करायचे. त्याचा सराव, खुराक आणि स्पर्धा यासाठी ते रात्रंदिवस कष्ट करायचे. आपल्या मुलाने कुस्तीत खूप मोठे यश मिळवावे, असे कुटुंबीयांचे स्वप्न होते.
आकाशलाही परिस्थितीची जाणीव होती. साडेसहा फूट उंच आकाश मनमिळावू आणि शांत स्वभावाचा होता. तो कुस्तीत खूप मोठे यश मिळवेल, अशी कुस्तीतज्ज्ञांनाही खात्री होती. मात्र नियतीने होत्याचे नव्हते केले.
आकाशचा अनपेक्षित मृत्यू झाला. आणि काले गावासह कुस्ती क्षेत्रावर शोककळा पसरली. मालखेड येथील सौरभ माने याचाही या अपघातात मृत्यू झाला असून, नामवंत मल्ल अशी त्याची परिसरात ओळख होती.