साता-यात विद्यार्थ्यांनी बनविले दोन हजार बीजगोळे
By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2018 02:24 PM2018-07-01T14:24:03+5:302018-07-01T14:24:44+5:30
खटाव तालुक्यातील विखळे येथील कमलेश्वर विद्या मंदिरातील विद्यार्थ्यांनी उन्हाळ्यामध्ये दोन हजार बीजगोळे बनविले आहेत.
मायणी (सातारा) : खटाव तालुक्यातील विखळे येथील कमलेश्वर विद्या मंदिरातील विद्यार्थ्यांनी उन्हाळ्यामध्ये दोन हजार बीजगोळे बनविले आहेत. या बीजगोळ्यांची लागण करून विखळे, पाचवड व ढोकळवाडी परिसर हिरवागार करण्याचा संकल्प तेथील चिमुरड्यांनी केला आहे. त्यासाठी रविवारपासून सुरुवात करण्यात आली.
मुख्याध्यापक पोपट मिंड लोकमतशी बोलताना म्हणाले, विखळे विद्यालयातील उपशिक्षक सयाजी जाधव यांनी उन्हाळ्यामध्ये एक दिवसीय प्रशिक्षण घेऊन विद्यार्थ्यांना बीजगोळे तयार करण्यासंदर्भात माहिती दिली. या माहितीच्या आधारे विद्यार्थ्यांनी उन्हाळ्याच्या सुटीमध्ये सुमारे दोन हजार बीजगोळे तयार केले.
परिसरामध्ये मान्सूनपूर्व व मान्सून पाऊस समाधानकारक झाल्यामुळे ओलावा निर्माण झाला आहे. या परिसरातील विखळे-पाचवड रस्ता व विखळे-ढोकळवाडी रस्ता तसेच परिसरामध्ये असणाऱ्या माळरानावर ते या बीजगोळ्यांचे रोपण करणार आहेत.
- माती व शेण समप्रमाणात घेऊन त्याचे योग्य मिश्रण करुन त्यामध्ये विविध झाडांच्या बियामध्ये घालून तयार केलेला माती व शेणाचा गोळा म्हणजे बीजगोळा होय. ही पद्धत प्रमुख्याने परदेशात वापरली जाते. यामुळे आतील बीजाला कीड लागत नाही किंवा पक्षी खात नाहीत, त्यामुळे बिजापासून योग्य प्रकारची रोपे तयार होतात.
- सयाजी जाधव
उपशिक्षक विखळे विद्यालय.