सातारा : यात्रेवरून परतताना वाईजवळ दोन युवक ठार, एक जखमी; दुचाकी-कारची धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2018 12:10 PM2018-04-21T12:10:38+5:302018-04-21T12:10:38+5:30
यात्रा करून दुचाकीवरून गावी परताना कारने दिलेल्या धडकेत दोन युवक ठार झाले असून, एकजण गंभीर जखमी आहे. हा अपघात वाई-पाचवड रस्त्यावरील भीमनगर-तिकाटणे येथे शुक्रवार, दि. २० रोजी रात्री अकराच्या सुमारास झाला. शुभम प्रवीण महिंद्रे, अक्षय रघुनाथ चिकणे असे ठार झालेल्यांची नावे आहेत.
वाई (सातारा) : यात्रा करून दुचाकीवरून गावी परताना कारने दिलेल्या धडकेत दोन युवक ठार झाले असून, एकजण गंभीर जखमी आहे. हा अपघात वाई-पाचवड रस्त्यावरील भीमनगर-तिकाटणे येथे शुक्रवार, दि. २० रोजी रात्री अकराच्या सुमारास झाला. शुभम प्रवीण महिंद्रे, अक्षय रघुनाथ चिकणे असे ठार झालेल्यांची नावे आहेत.
वाई पोलीस ठाणे व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, शुभम प्रवीण महिंद्रे (वय २१), अक्षय रघुनाथ चिकणे (२२, रा. नावेचीवाडी, वाई) व पंकज सुनील चव्हाण (रा़ सारंग सोसायटी, वाई) हे तिघेजण शुक्रवार, दि़ २० रोजी कळंभे येथे यात्रेसाठी दुचाकीवरून (एमएच ११ सीएफ ३२५२) गेले होते़.
यात्रेवरून माघारी येताना वाई-पाचवड रोडवर रात्री पावणेअकराच्या सुमारास ते तिकाटणे येथे आले. त्यावेळी वाईहून पाचवडच्या दिशेने निघालेली कार (एमएच ०५ एजी ६८३८) आणि दुचाकीची समोरासमोर धडक बसली.
यामध्ये शुभम महिंद्रे हा जागीच ठार झाला. अपघाताची माहिती समजताच परिसरातील नागरिकांनी अपघातस्थळी धाव घेऊन गंभीर जखमींना वाई येथील खासगी दवाखान्यात दाखल केले़ दरम्यान, उपचार सुरू असताना अक्षय चिकणेचा मृत्यू झाला़ अपघाताची माहिती मिळताच वाई पोलीस घटनास्थळी दाखल झाले़