माऊलींच्या परतीच्या प्रवासात वाद; पादुकांचे दर्शन न दिल्याने वारकऱ्याचे ठिय्या आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2024 10:12 AM2024-07-26T10:12:55+5:302024-07-26T13:01:22+5:30
माऊली माऊलीच्या जयघोषणात व टाळ वाजवत हे वारकरी गेली अर्धा तास बसून आहेत.
सातारा: माऊलींच्या परतीच्या प्रवासामध्ये नीरा नदीवरती वारकऱ्यांमध्ये व विश्वस्तांमध्ये वाद निर्माण झाला आहे. सुमारे अर्ध्या तासापूर्वी माऊलींच्या पादुकांचे रथाच्या मागील वारकऱ्यांना दर्शन न दिल्याने रथाच्या मागील वारकऱ्यांनी रतापुढे येऊन ठिया आंदोलन केले आहे. यावेळी माऊली माऊलीच्या जयघोषणात व टाळ वाजवत हे वारकरी गेली अर्धा तास बसून आहेत. सोहळ्याचे मालक व विश्वस्त याबाबत अरेरावेची भूमिका घेत वारकऱ्यांची समझोता न करता रथ तसाच पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहेत याला वारकऱ्यांकडून प्रखर विरोध होत आहे.
आषाढी एकादशीच्या दर्शनानंतर माऊलींचा पालखी सोहळा परतीच्या प्रवासाकडे निघाला आहे. परतीच्या प्रवासात रथा पुढे २७ तर रथामागे ३५० दिंड्या आहेत. गुरुवारी पाडेगाव (ता. खंडाळा) येथील मुक्काम आटपून आज सकाळी पावणे नऊ वाजता नीरा नदीच्या पवित्र तीर्थ माऊलींच्या पादुकांना स्नान घालण्यात आले. यानंतर माऊलींचा पालखी सोहळा मालकांकडून पादुका राथाकडे येत असताना प्रथे प्रमाणे रथाच्या पुढे दोन ओळी व रथाच्या मागे दोन ओळी वारकऱ्यांनी तयार केल्या होत्या. सोहळा मालकांनी पादुकांचे वारकऱ्यांना दर्शन देणे हा एक अविस्मरणीय क्षण असतो. यावेळी सोहळा मालकांनी रथाच्या पुढील दोन्ही ओळींना दोन्ही ओळीतील वारकऱ्यांना पादुकांचे स्पर्श दर्शन दिले. मात्र माघारी फिरल्यानंतर रथाच्या मागील वारकरी विणेकरी व तुळशी घेतलेल्या महिलांना हे दर्शन दिली नाही.
सोहळा मालकांनी या पादुका पुन्हा रथात ठेवल्याने रथामागील वारकऱ्यांचा हिरमोड झाला व त्यांनी लागलीच रथा पुढे येऊन ठिय्या आंदोलन केले. माऊली माऊलीचा जयघोष करत सुमारे तासभर माऊलींचा रथ अडवून धरला. यानंतर सोहळ प्रमुख वह सोहळा मालक व आळंदी विश्वस्त यांनी वाद मिटवण्याचा प्रयत्न केला मात्र वारकरी आपल्या म्हणण्यावर ठाम राहिले यादरम्यान मोठा गोंधळ उडाला आहे. माऊलींचा रथ तासाभरानंतर मागील वारकऱ्यांना तसेच ठेवून नीरेकडे निघून गेला आहे. रथामागील वारकरी भजन म्हणत ठिय्या आंदोलनावर ठाम आहेत.