साताऱ्यात ढगांच्या गडगडाटात वरुणराजा बरसला...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 04:26 AM2021-07-08T04:26:20+5:302021-07-08T04:26:20+5:30
सातारा : जून महिन्याच्या मध्यावर दमदार हजेरी लावून दडी मारलेला पाऊस पुन्हा सक्रिय झाला आहे. साताऱ्यात तर १५ दिवसांनंतर ...
सातारा : जून महिन्याच्या मध्यावर दमदार हजेरी लावून दडी मारलेला पाऊस पुन्हा सक्रिय झाला आहे. साताऱ्यात तर १५ दिवसांनंतर बुधवारी ढगांच्या गडगडाटात चांगली हजेरी लावली. तर जिल्ह्याच्या काही भागातही वरुणराजाची कृषादृष्टी झाली. यामुळे पेरणी केलेल्या शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.
जिल्ह्यात या वर्षी माॅन्सूनचा पाऊस वेळेच्याही अगोदर दाखल झाला. जून महिन्याच्या पहिल्याच आठवड्यापासूनच वरुणराजा मेहेरबान झाला. २० जूनपर्यंत पश्चिम भागात दमदार पाऊस पडला. यामध्ये सलग चार दिवस धुवाधार वृष्टी झाली. यामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले. तसेच प्रमुख धरणांतही पाणीसाठा वाढीस लागला. तर पूर्व भागातील काही ठिकाणीही चांगली हजेरी लावली. त्यामुळे शेतकऱ्यांनी खरीप हंगामाची पेरणी केली. पिके उगवून आली. मात्र, पेरणीनंतर पावसाने दडी मारली ती जुलै उजाडला तरी कायम होती. मात्र, बुधवारपासून वरुणराजा पुन्हा सक्रिय झाला आहे.
जिल्ह्यात बुधवारी सकाळपासून ढगाळ वातावरण होते. मात्र, दुपारनंतर वातावरणात बदल झाला. साताऱ्यात दुपारी पावणेदोनच्या सुमारास ढगांच्या गडगडाटात पावसाला सुरुवात झाली. सुरुवातीला १५ मिनिटे जोरदार पाऊस झाला. मात्र, त्यानंतर जोर कमी झाला. या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला होता. तसेच खरेदीसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांची धावपळ उडाली. अडीच वाजल्यानंतर पाऊस उघडला. सायंकाळपर्यंत ढगाळ वातावरण होते.
दरम्यान, जिल्ह्याच्या पूर्व भागातील माण तालुक्यात काही ठिकाणी चांगला पाऊस झाला. तसेच सातारा तालुक्यातही वरुणराजाने हजेरी लावली. यामुळे उगवून आलेल्या पिकांना फायदा होणार आहे. येत्या काही दिवसांत आणखी एखादा मोठा पाऊस झाल्यास रखडलेली पेरणीही होईल, असे शेतकऱ्यांतून सांगण्यात येत आहे.
......................................................................