सातारा : भाजी विक्रेत्या झाल्या रणचंडिका, राजवाडा परिसरातील प्रकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2018 04:07 PM2018-07-04T16:07:37+5:302018-07-04T16:10:43+5:30
प्रतापसिंह भाजी मंडईत महिला विक्रेत्यांच्या चेहऱ्यावर लाईट मारणाऱ्या माथेफिरूला येथील महिलांनी चांगलीच अद्दल घडवून त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले. हा प्रकार मंगळवारी रात्री नऊच्या सुमारास घडला.
सातारा : प्रतापसिंह भाजी मंडईत महिला विक्रेत्यांच्या चेहऱ्यावर लाईट मारणाऱ्या माथेफिरूला येथील महिलांनी चांगलीच अद्दल घडवून त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले. हा प्रकार मंगळवारी रात्री नऊच्या सुमारास घडला.
राजवाडा परिसरात असलेल्या प्रतापसिंह भाजी मंडईत महिला विक्रेत्यांची संख्या लक्षणीय आहे. संध्याकाळी पाचनंतर मंडईत गर्दी वाढते, त्यामुळे घरातील महिलाही येथे भाजी विक्रीसाठी बसतात.
महिलांसाठी सुरक्षित असलेल्या मंडईत शुक्रवारपासून अज्ञात व्यक्ती लेझर आणि लाईट मारत असल्याचे विक्रेत्यांच्या निदर्शनास येत होते. मात्र, दुकानापुढे विक्रेत्यांची गर्दी वाढती असल्यामुळे या प्रकाराकडे त्यांनी दुर्लक्ष केले.
सलग तीन दिवस होऊनही हा प्रकार थांबेना म्हटल्यावर मंगळवारी विक्रेत्यांनी ठरवून संबंधिताचा शोध घेण्याचं ठरविलं. मंगळवारीही रात्री सातच्या सुमारास पुन्हा लाईट मारण्याचा प्रकार सुरूच होता. त्यामुळे संतापलेल्या महिला भाजी विक्रेत्यांनी संबंधितांना अद्दल घडविण्याचं ठरविलं.
मंडईतील गर्दी आटोक्यात आल्यानंतर परस्परांना खुणावून या महिला एकेक करून मंडईच्या बाहेर पडल्या, त्यांच्यासमवेत काही तरुणही गेले. मंडईशेजारी असणाऱ्या प्रतापसिंह वाड्यात अंदाजाने हे विक्रेते पोहोचले.
वाड्याच्या दुसऱ्या मजल्यावर त्यांना बोलणे ऐकू आले. त्या दिशेने त्या दुसऱ्या मजल्यावर पोहोचल्या तर तिथे मद्यधुंद अवस्थेत तीन युवक बसल्याचे त्यांना दिसले. यातील एका युवकाच्या हातात बॅटरी सुरू असलेला मोबाईल आढळला.
राजवाड्याच्या मजल्यावर एकदम आलेल्या विक्रेत्यांना पाहून दोघा मद्यपींनी तिथून उड्या मारून पळ काढला. तर एकजण विक्रेत्यांच्या तावडीत सापडला. संतप्त झालेल्या महिला विके्रत्यांनी त्याला बेदाम चोप देत रस्त्यावर आणला.
युवक सापडल्या सापडल्या काही विक्रेत्यांनी पोलिसांत कळविले. त्यामुळे लगेचच पोलिसांच्या गाडीतून त्या युवकाची पोलीस ठाण्यात रवानगी करण्यात आली. दरम्यान, मंडईतील महिला भाजी विक्रेत्यांच्या या धाडसाचे कौतुक परिसरातील नागरिकांसह पोलिसांनीही केले.
एक सोडून बाकी सगळ्या मोहिमेवर..
चार दिवसांपासून सुरू असलेला हा त्रास असह्य झाल्याने संबंधिताला अद्दल घडविण्याची मोहीम सोमवारी रात्रीच निश्चित झाली होती. ज्या महिलांच्या चेहऱ्यावर लाईट पाडली जाते, त्यातील एका महिलेला मंडईत ठेवून बाकीच्या महिला त्याच्या शोधार्थ बाहेर पडल्या. सगळ्याच महिला बाहेर पडल्या असत्या तर संबंधित माथेफिरू सावध झाला असता, ही त्यामागची योजना होती.