सातारा : वानरांच्या टोळीला ग्रामस्थांनीच केले जेरबंद, किवळमधील घटना : वनविभागावर संताप; नुकसान केल्याने पन्नासहून जास्त वानरे पिंजऱ्यात कोंडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2018 05:14 PM2018-01-12T17:14:16+5:302018-01-12T17:19:31+5:30
किवळ, ता. कऱ्हाड परिसरात वानरांनी धुमाकूळ घालत शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान केले आहे. वनविभागाला वारंवार सांगूनही त्यांच्याकडून या वानर टोळीचा बंदोबस्त झाला नाही. अखेर संतापलेल्या शेतकऱ्यांनीच शुक्रवारी या वानरांना जेरबंद केले. पन्नासहून जास्त वानरे पकडून त्यांना पिंजऱ्यांत कोंडले.
मसूर : किवळ, ता. कऱ्हाड परिसरात वानरांनी धुमाकूळ घालत शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान केले आहे. वनविभागाला वारंवार सांगूनही त्यांच्याकडून या वानर टोळीचा बंदोबस्त झाला नाही. अखेर संतापलेल्या शेतकऱ्यांनीच शुक्रवारी या वानरांना जेरबंद केले. पन्नासहून जास्त वानरे पकडून त्यांना पिंजऱ्यांत कोंडले.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळाल्यानंतर गावात पोहोचलेल्या वन विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना ग्रामस्थांनी चांगलेच फैलावर घेतले. यापूर्वी अनेकवेळा सांगूनही कोणीही गावाकडे फिरकले नाही. मग आज कशाला आलात, असे म्हणून अधिकाऱ्यांची चांगलीच झाडाझडती घेतली. त्यामुळे काहीकाळ तणाव निर्माण झाला होता.
किवळ परिसरात धुमाकूळ घालणाऱ्या वानरांचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकरी व ग्रामस्थांनी वन विभागाकडे केली होती. मात्र, वनविभागाने याबाबत कोणतीही कारवाई केली नाही. त्यामुळे संतप्त झालेले किवळचे ग्रामस्थ शुक्रवारी सकाळी एकवटले. त्यांनी लोखंडी पिंजरा आणून त्यामध्ये वानरांना कोंडण्याचा प्रयत्न सुरू केला.
वेगवेगळ्या ठिकाणावरून हुसकावून अनेक वानरे त्यांनी एकाच जागेवर आणली. त्याठिकाणी ठेवलेल्या पिंजऱ्यांत त्यांना कोंडण्यात आले. यावेळी मोठा गोंधळ उडाला होता. वानरांचा पाठलाग करणारे ग्रामस्थ आरडाओरडा करीत त्यांना हुसकावण्याचा प्रयत्न करीत होते. तर ग्रामस्थांना हुल देत वानरसेना झाडांवर उड्या घेत होती. अखेर पन्नासपेक्षा जास्त वानरांना ग्रामस्थांनी पिंजऱ्यांमध्ये कोंडले.
किवळ, ता. कऱ्हाड येथील ग्रामस्थांनी शुक्रवारी पन्नासपेक्षा जास्त वानरे पकडून त्यांना पिंजऱ्यात कोंडले. (छाया : जगन्नाथ कुंभार)