सातारा : वेळूत ग्रामस्थांनी दोन एसटी रोखल्या, महामंडळाच्या कारभाराचा निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2018 12:53 PM2018-10-08T12:53:47+5:302018-10-08T12:56:46+5:30
कोरेगाव तालुक्यातील वेळू येथे सकाळी साडेआठ वाजता येणारी व सायंकाळी साडेपाचच्या दरम्यान येणारी अशा दोन बंद केलेल्या एसटी तत्काळ सुरू कराव्यात, या मागणीसाठी ग्रामस्थांसह विद्यार्थ्यांनी सोमवारी दोन एसटींची तब्बल दोन तास वाहतूक रोखली.
रहिमतपूर : कोरेगाव तालुक्यातील वेळू येथे सकाळी साडेआठ वाजता येणारी व सायंकाळी साडेपाचच्या दरम्यान येणारी अशा दोन बंद केलेल्या एसटी तत्काळ सुरू कराव्यात, या मागणीसाठी ग्रामस्थांसह विद्यार्थ्यांनी सोमवारी दोन एसटींची तब्बल दोन तास वाहतूक रोखली.
वेळू येथील शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी दररोज रहिमतपूर व कोरेगाव येथे शिक्षणासाठी ये-जा करतात. दररोज सकाळी साडेआठ वाजता कोरेगाव-वेळू व सायंकाळी साडेपाच वाजता सातारा-कामथी अशा दोन एसटी येत असल्यामुळे विद्यार्थ्यांची सोय होत होती.
मात्र, गेल्या काही महिन्यांपासून या दोन्हीच्या एसटी अचानक बंद केल्यामुळे विद्यार्थ्यांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. या बंद केलेल्या एसटी सेवा पुन्हा पूर्ववत सुरू कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने यापूर्वी वारंवार करण्यात आली.
मात्र, एसटी महामंडळाचे अधिकारी या मागण्यांकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करत आहेत. सकाळच्या वेळेत एसटी नसल्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यास उशीर होतो. तर संध्याकाळी साडेपाच वाजता येणारी एसटीही बंद झाल्यामुळे शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी व विद्यार्थिनींना रात्री-अपरात्री घरी यावे लागते.
साप येथून कोरेगावला जाणारे व साताऱ्याला जाणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांसह प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागला अनेकांनी मिळेल त्या वाहनातून रहिमतपूर गाठले. दरम्यान, एसटीची वाहतूक रोखल्याची माहिती रहिमतपूर पोलिसांना मिळाल्यानंतर घटनास्थळी पोहचून ग्रामस्थ व विद्यार्थ्यांची समजूत काढून एसटींची वाहतूक पूर्ववत केली.
विनंतीला महामंडळाचा कोलदांडा..
विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी ग्रामस्थांनी एसटी महामंडळाला केलेल्या विनंतीला महामंडळ कोलदांडा लावत असल्यामुळे नाईलाजाने ग्रामस्थांसह विद्यार्थ्यांना एसटी आडवाव्या लागल्या, अशी माहिती ग्रामस्थांनी दिली. सोमवारी सकाळी कोरेगाव-वेळू व सातारा-वेळू अशा दोन एसटी ग्रामपंचायत कार्यालयासमोर तब्बल दोन तास अडवून ठेवण्यात आल्या होत्या.