साताऱ्याला रात्रभर पावसाने झोडपले !,विजांच्या कडकडाटात हजेरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2020 01:53 PM2020-10-13T13:53:55+5:302020-10-13T13:55:58+5:30
rain, satararnews, koynadam, सातारा जिल्ह्यात परतीचा पाऊस धुमाकूळ घालत असून आतापर्यंत सर्वत्र हजेरी लावली आहे. तर सोमवारी रात्री अकरानंतर सातारा शहराला पावसाने झोडपून काढले. विजांच्या कडकडाटात झालेल्या पावसामुळे काहीवेळ वीजपुरवठाही खंडित झाला होता. तर अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे कोयना धरणातून विसर्ग सुरू करण्यात आला आहे.
सातारा : जिल्ह्यात परतीचा पाऊस धुमाकूळ घालत असून आतापर्यंत सर्वत्र हजेरी लावली आहे. तर सोमवारी रात्री अकरानंतर सातारा शहराला पावसाने झोडपून काढले. विजांच्या कडकडाटात झालेल्या पावसामुळे काहीवेळ वीजपुरवठाही खंडित झाला होता. तर अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे कोयना धरणातून विसर्ग सुरू करण्यात आला आहे.
जिल्ह्यात परतीचा पाऊस पडू लागला आहे. शनिवारपासून जिल्ह्यात सर्वदूर पाऊस होत आहे. सातारा, कऱ्हाड, पाटण, माण, खटाव, खंडाळा, वाई, कोरेगाव, महाबळेश्वर, फलटण जावळी या सर्वच तालुक्यात कमी अधिक प्रमाणात पाऊस होत आहे. विशेष करुन दुष्काळी भागात परतीच्या पावसाचा जोर अधिक आहे. त्यातच आणखी काही दिवस पावसाची शक्यता आहे.
शनिवारपासून पाऊस सुरू असून मंगळवारी पहाटेपर्यंत जिल्ह्यात ठिकठिकाणी पाऊस झाला. तर मंगळवारी बहुतांशी भागात ढगाळ वातावरण होते. सोमवारी रात्री पावणे आकरानंतर सातारा शहराला पावसाने झोडपले.
ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटात पाऊस कोसळत होता. ढगांच्या गडगडाटामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यातच वीजपुरवठाही खंडित झाला होता. पावसाचा जोर कमी झाल्यानंतर वीज आली. शहरात मंगळवारी सायंकाळपर्यंत ढगाळ वातावरण होते. तरीही उकाडा वाढला होता.
कोयनेच्या पायथा वीजगृहातून विसर्ग...
जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा असल्याने कोयना धरण व्यवस्थापनने पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी विसर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार पायथा वीजगृहातून प्रथम १०५० क्यूसेक विसर्ग सुरू करण्यात आला. त्यानंतर मंगळवारी सकाळच्या सुमारास वाढ करुन तो २१०० क्यूसेक करण्यात आला.
मंगळवारी सकाळी ८ पर्यंतच्या २४ तासांत कोयनेला १२, नवजा येथे ८ आणि महाबळेश्वरला २ मिलिमीटर पाऊस झाला. कोयना धरणाची पाणी साठवण क्षमता १०५.२५ टीएमसी आहे. सकाळच्या सुमारास धरणात १०४.६० टीएमसी पाणीसाठा होता.