सातारा ---इकडे पाणी... तिकडे राजकारणी!---आॅन दि स्पॉट रिपोर्ट

By admin | Published: August 31, 2014 10:05 PM2014-08-31T22:05:32+5:302014-08-31T23:29:38+5:30

गोडोलीकरांची कोंडी : ओढा वाहता केला तरी धास्ती कायम; भरपाईचीही नाही शाश्वती

Satara --- water here ... politician ... --- The Spot Report | सातारा ---इकडे पाणी... तिकडे राजकारणी!---आॅन दि स्पॉट रिपोर्ट

सातारा ---इकडे पाणी... तिकडे राजकारणी!---आॅन दि स्पॉट रिपोर्ट

Next

राजीव मुळ्ये - सातारा ‘माझी दोन वेळा मुलाखत झाली; पुढं काहीच होत नाही,’ असे म्हणून कोणी बोलायचे टाळतो, तर ‘मी त्यावेळी नव्हतोच,’ असे म्हणून कोणी वाट धरतो. पुरामुळे अतोनात नुकसान होऊनही गोडोलीकर चिडीचूप. शेवटी काही जण दबकत-दबकत माहिती देतात, ‘नाव छापू नका’ म्हणतात आणि त्यावरून एवढाच बोध होतो की, ‘इकडे पाणी, तिकडे राजकारणी’ अशी गोडोलीकरांची विचित्र कोंडी झाली आहे.
वीस आॅगस्टपासून पावसाने गोडोलीकरांचा पिच्छा पुरविला आहे. भैरवनाथाचा ओढा आणि काळिंबीचा ओढा याच्या मधला परिसर जणू ‘वॉटर बाउल’ बनला आहे. पावसाचा जोर थोडा जरी वाढला तरी येथील दुकानांत पाणी शिरते. शुक्रवारी पुन्हा पाणी साचल्यावर संतापलेल्या गोडोलीकरांनी काळिंबीचा ओढा ज्या पाइपमध्ये बंदिस्त केला आहे, तो फोडायला सुरुवात केली. शनिवारी त्यांनी वर्गणी काढून जेसीबी भाड्याने आणला आणि पाण्याला वाट मोकळी करून दिली. परंतु तरीही या भागात पाणी साचणारच नाही, असे ते खात्रीने सांगू शकत नाहीत.रविवारी जो-तो आपापल्या दुकानापुढील चिखल कसा साफ करायचा, या विवंचनेत होता. काहींनी दुकानापुढे भराव घालून पाण्याचा प्रवाह आपल्यापुरता अडविण्याचा प्रयत्न सुरू ठेवलाय. वाहनांची गॅरेज या भागात मोठ्या संख्येने आहेत. इंजिनात चिखल जाऊन कोणी स्वत:ची तर कोणी ग्राहकाची गाडी बरबाद होताना पाहिली आहे. कुठपर्यंत पाणी चढले होते, याच्या खुणा ही मंडळी दाखवतात; पण फारसे बोलत नाहीत. याची एकंदर तीन कारणे असल्याचे जाणवले. एक तर माध्यमांनी मोठ्या प्रमाणावर दखल घेऊनही पुढे काहीच होत नाही, असे त्यांचे ठाम मत बनले आहे. दुसरे म्हणजे, स्वत:च ओढ्याच्या पाण्याला वाट करून देण्याच्या घटनेचे काय पडसाद उमटतील याची चिंता त्यांना आहे. तिसरे महत्त्वाचे कारण म्हणजे, काहीही बोललो तरी त्याला राजकीय वळण लागण्याची धास्ती त्यांना वाटते.
प्राप्त माहितीनुसार, एका विस्थापित कुटुंबाचे पुनर्वसन करण्यासाठी गोडोली तळ्याचा एक हिस्सा त्याला देण्यात आला. हा निर्णय ‘वरूनच’ झाला म्हणे! आता निम्म्या तळ्यात उसाचे शेत दिसते, तर उर्वरित तळ्याचे सुशोभीकरण झाले आहे. वीस तारखेच्या पुराने रस्त्याजवळील कार्यालयातून वाहून गेलेला अवजड जनरेटर सध्या उसाच्या शेतात दिसतो. काळिंबीच्या ओढ्यावरील पाइप फोडल्यानंतर संबंधिताने कोणतीही तक्रार दिली नाही यावरून त्याला रहिवाशांचे म्हणणे मान्य आहे, असा सूर गोडोलीकर लावतात. या ओढ्यावरचा पूल तीन गाळ्यांचा आहे. एवढा विस्तृत ओढा केवळ एका पाइपमध्ये बंदिस्त करण्याचा प्रयत्न झाला होता. रस्त्याच्या पलीकडील बाजूसही ओढ्याचे पात्र अरुंदच दिसते. भैरवनाथाचा ओढाही चेंबर बांधून दोन ठिकाणी वळविण्यात आला आहे. ‘जिथे चार पाइप लावावे लागतील, तिथे एकच पाइप लावलाय,’ असे ही मंडळी सांगतात. दीर्घकालीन उपायात आड येऊ नये, अशी त्यांची इच्छा आहे.

काय उपयोग पंचनाम्यांचा?
यापूर्वी १९९३ मध्ये साताऱ्यात सर्वांत मोठा पाऊस झाला होता. त्यावेळी गोडोली भाग सुरक्षित राहिला होता. २००७ नंतरच या समस्येने हातपाय पसरले. दरम्यानच्या काळात या भागात झालेल्या बांधकामांनी डोंगरावरून वाहणाऱ्या नैसर्गिक ओढ्यांची रुंदी कमी-कमी करत नेली. ‘नैसर्गिक प्रवाह अडविल्याने आणि वळविल्यानेच हे घडले,’ हे गोडोलीकर ठामपणे सांगतात; पण ‘आता काय करायला हवे,’ असा प्रश्न विचारला की गप्प होतात. ‘चार वर्षांपूर्वीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीची भरपाईच अजून मिळाली नाही, तर आताही पंचनामे होऊन काय उपयोग होणार,’ असे ते हताशपणे म्हणतात.

प्रतिष्ठेपेक्षा गरज महत्त्वाची
गोडोली गावठाणात दोन राजकीय गट आहेत, असे स्थानिक दबक्या आवाजात बोलतात. वीस आॅगस्टच्या पुरानंतर झालेल्या पत्रकबाजीतूनही ते उघड झाले होते. परंतु नुकसानग्रस्तांना गटापेक्षा समस्या सुटण्याची आणि झालेल्या नुकसानीची भरपाई मिळण्याची निकड अर्थातच अधिक वाटते. ‘कोणीही प्रतिष्ठेचा प्रश्न करू नये. झालेल्या चुका शास्त्रीय दृष्टिकोन वापरून दुरुस्त कराव्यात,’ अशी टिपण्णी ते आतल्या आवाजात करतात.

Web Title: Satara --- water here ... politician ... --- The Spot Report

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.