भर पुरातही साताऱ्याची पाणी योजना अखंडित सुरू -: संजय गायकवाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2019 11:46 PM2019-10-05T23:46:39+5:302019-10-05T23:49:27+5:30
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणची पाणी योजना कृष्णा नदीवर आहे. पश्चिम भागात मोठा पाऊस झाल्यानं कृष्णा नदीला पूर आला होता. आम्ही उपाययोजना राबविली. - संजय गायकवाड, कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण
सागर गुजर।
यंदाच्या पावसाने भलताच कहर केला. जिल्ह्यातील बहुतांश नद्यांना पूर आला. नदीकाठच्या पाणी योजना पुराच्या पाण्याखाली गेल्या. आजच्या घडीला अनेक योजनांमध्ये गाळ साठला आहे; परंतु सातारा शहराचा पूर्वभाग तसेच आजूबाजूच्या उपनगरांना पाणीपुरवठा करणारी कृष्णा नदीवरील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची पाणी योजना अखंडितपणे सुरू राहिली. प्राधिकरणचे अधिकारी आणि कर्मचारी तसेच निवृत्त अभियंत्यांनी दूरदृष्टी दाखवून पावसाळ्यात युद्धपातळीवर उपायोजना आखल्याने हे शक्य झाले.
प्रश्न : पूर परिस्थितीत काय उपाय केले?
उत्तर : साताºयाची पाणी योजना ही माहुली येथील कृष्णा नदीवर आहे. यंदा नदीला मोठा पूर आला होता. पंपिंग हाऊसमध्ये पाणी गेले असते तर अनेक दिवस ही योजना बंद पडली असती; परंतु आम्ही पंपिंग हाऊसला धोका निर्माण होऊ नये, यासाठी तसेच पंपिंग हाऊसमध्ये पाणी शिरू नये, याची आधीच खबरदारी घेतली होती.
प्रश्न : पाणीपट्टी वसुलीचे प्रमाण काय?
उत्तर : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या ग्राहकांकडून दरवर्षी सहा ते सात कोटी रुपयांची पाणीपट्टी वसुली होत होती. मी आल्यानंतर वसुलीवर भर दिला. विशेषत: थकबाकी वसुली केली. गतवर्षी तब्बल ११ कोटींचा वसूल करून आम्ही तो शासनाच्या तिजोरीत भरला आहे. विकासकामांसाठी पैसे महत्त्वाचे असतात. थकित रकमा वसूल झाल्याने आम्ही जलसंपदाचे बिल भरू शकलो.
प्रश्न : जलसंपदाची देणी दिली का?
उत्तर : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणची पाणी योजना ही नदीवर आहे. योजनेसाठी पाणी वापरत असल्याने त्याची पाणीपट्टी जलसंपदा विभागाला भरावी लागते. सन २००६ ते २०१९ या कालावधीतील थकलेली १ कोटी ४५ लाखांची वसुली आम्ही भरली आहे. एका रुपयाचाही देणे राहिलेले नाही. शासकीय कार्यालयांकडील थकबाकी वसूल केल्याने हे शक्य झाले आहे.
‘इंजिनिअर डे’ च्या निमित्ताने सत्कार
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या सातारा कार्यालयात कार्यकारी अभियंता म्हणून काम करणाºया संजय गायकवाड यांनी आपल्या कर्तृत्वाचा वेगळा ठसा उमटवला आहे. नेहमीच्या कामासोबतच शासकीय महसूल मोठ्या प्रमाणावर जमा करून जलसंपदा विभागाची असलेली थकबाकी ही त्यांनी पूर्ण भरल्याने ‘इंजिनिअर्स डे’ च्या निमित्ताने पुण्यात त्यांचा विशेष सत्कार झाला.
थकबाकी वसुली
प्राधिकरणाच्या माध्यमातून सातारा शहराचा पूर्वभाग शहरालगतची मोठी उपनगरे तसेच काही ग्रामपंचायतींच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर पाणीपुरवठा केला जातो. यात शासकीय इमारतींचाही समावेश आहे. ही वसुली करण्यावर भर दिला. शासकीय कार्यालतयांकडे अनेक दिवसांची थकबाकी होती. ती वसूल करण्यावर भर दिला. त्यात यशही आले. आता थकबाकी राहिली आही.