Satara: सिंचनासाठी कोयनेतून सांगलीला पुन्हा सोडले पाणी, १०५० क्यूसेक विसर्ग
By नितीन काळेल | Published: September 22, 2023 12:53 PM2023-09-22T12:53:30+5:302023-09-22T12:53:47+5:30
Satara News: सातारा जिल्ह्यात पाऊस कमी असल्याने यंदा कोयना भरले नसलेतरी सांगली जिल्ह्यातून सिंचनासाठी मागणी असल्याने धरणातून पुन्हा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे पायथा वीजगृहातून १०५० क्यूसेक वेगाने पाणी सोडले जात आहे.
- नितीन काळेल
सातारा : जिल्ह्यात पाऊस कमी असल्याने यंदा कोयना भरले नसलेतरी सांगली जिल्ह्यातून सिंचनासाठी मागणी असल्याने धरणातून पुन्हा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे पायथा वीजगृहातून १०५० क्यूसेक वेगाने पाणी सोडले जात आहे. तर धरणात सध्या ९१ टीएमसी पाणीसाठा झालेला आहे.
जिल्ह्यात यावर्षी पावसाचे प्रमाण कमी आहे. सप्टेंबर महिना संपत आलातरी वार्षिक सरासरीच्या ६० टक्केही पर्जनम्यान झालेले नाही. त्यामुळे पश्चिम भागातील कोयनेसह उरमोडी, कण्हेर ही मोठी धरणे भरलेली नाहीत. तर बलकवडी आणि तारळी धरणांत तेवढा चांगला पाणीसाठा आहे. तर पूर्व भागातील पाझर तलाव कोरडे पडलेले आहेत. अशातच अजुनही दमदार पाऊस नसल्याने खरीप हंगामातील पिकांसाठी आणि पिण्याच्या पाण्याची मागणी वाढत चालली आहे. यामुळे धरणांमधून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.
सांगली पाटबंधारे विभागाकडून सिंचनाची मागणी झाली आहे. त्यामुळे कोयना धरणातून गुरुवारपासून पाणी विसर्ग सुरू करण्यात आला आहे. धरणाच्या पायथा वीजगृहाचे एक युनिट सुरू करुन त्यातून १०५० क्यूसेक पाण्याचा विसर्ग सांगलीसाठी करण्यात येत आहे. तर दमदार पावसाअभावी कोयना धरण अजुन भरलेले नाही. शुक्रवारी सकाळच्या सुमारास धरणात ९०.९९ टीएमसी पाणीसाठा झाला होता. तर धरणात ७९०७ क्यूसेक वेगाने पाणी येत होते. धरण भरण्यासाठी अजुन १४ टीएमसी पाण्याची गरज आहे.
शुक्रवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कायेनानगरला अवघा ८ मिलीमीटर पाऊस झाला. तर नवजा येथे १४ आणि महाबळेश्वरला २५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्याचबरोबर एक जूनपासून सर्वाधिक पाऊस ५५२० तर कोयना येथे ३८९१ आणि महाबळेश्वरला ५२८२ मिलीमीटर पर्जन्यमान झालेले आहे. तरीही यंदा मागीलवर्षीपेक्षा कमी पाऊस पडलेला आहे.