सातारा : तळहिरा तलावातून पाण्याची राजरोस चोरी, पाणीसाठा खालावला : तीन गावांत पाणी टंचाईचे सावट; इलेक्ट्रिक मोटारीचा वापर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2017 01:09 PM2017-12-23T13:09:51+5:302017-12-23T13:14:24+5:30
कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागातील शेती व पिण्याच्या पाण्यासाठी वरदान ठरणाऱ्या तळहिरा पाझर तलावातून इलेक्ट्रिक मोटारी लावून पाणी चोरी सुरू आहे. त्यामुळे पाणीसाठा खालावत असून, तीन गावांवर पाणीटंचाईचे सावट निर्माण झाले आहे. लवकर लक्ष न दिल्यास भविष्यात या भागाला पाण्यासाठी भटकंती करण्याशिवाय पर्याय उरणार नाही.
वाठार स्टेशन : कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागातील शेती व पिण्याच्या पाण्यासाठी वरदान ठरणाऱ्या तळहिरा पाझर तलावातून इलेक्ट्रिक मोटारी लावून पाणी चोरी सुरू आहे. त्यामुळे पाणीसाठा खालावत असून, तीन गावांवर पाणीटंचाईचे सावट निर्माण झाले आहे. लवकर लक्ष न दिल्यास भविष्यात या भागाला पाण्यासाठी भटकंती करण्याशिवाय पर्याय उरणार नाही. त्यामुळे याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घालावे, अशी मागणी होत आहे.
यावर्षी कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागात अत्यल्प पाऊस झाला. त्यामुळे तळहिरा तलावात कमी पाणीसाठा झाला. परिणामी या तलावावर अवलंबून असलेल्या अनेक गावांना भविष्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवणार आहे.
कारण असलेला पाणीसाठा टिकला तरच उन्हाळ्यातील काही महिने या परिसरातील गावांची तहान भागणार आहे. मात्र, सध्या दिवस-रात्र या तलावातील पाणी इलेक्ट्रिक मोटारी टाकून चोरण्याचा धक्कादायक प्रकार राजरोसपणे सुरू आहे. हे पाणी दिवसेंदिवस कमी होऊ लागले आहे.
वाठार स्टेशन, तळिये व देऊर या प्रमुख तीन गावांची तहान भागवणारा हा तळहिरा तलाव आहे. गेल्या पाच वर्षांत पूर्ण क्षमतेने कधीच भरला नाही. चालू वर्षीही जिल्ह्यातील सर्वच मोठी धरणे, पाझर तलाव पूर्ण क्षमतेने भरले असताना तळहिरा तलावात मात्र केवळ ३० टक्के एवढाच पाणीसाठा झाला आहे.
यातून देऊरमधील हंगामी शेती तसेच परवानाधारक शेतकरी यांच्यासाठी या पाणी सोडले गेले तर या तलावात पाणीच शिल्लक राहणार नाही, अशी परिस्थिती आहे. सध्या या तलावात परवानाधारक शेतकºयांशिवाय अनेक बिनापरवाना मोटारीद्वारे या तलावातील पाणी शेतीसाठी वापरले जात आहे.
देऊर व तळिये गावात ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी या तलावात गेल्या त्यांच्यासाठी या तलावातून पाणी देण्याची व्यवस्था असल्याने शेतीसाठी हे पाणी हे शेतकरी वापरत आहेत; परंतु असणाऱ्या परवानगीपेक्षा अधिक प्रमाणात पाणी चोरी होत असल्याने या तलावातील पाणी रातोरात कमी होऊ लागले आहे. याला संबंधित पाटबंधारे विभागाने आळा घातला नाही तर असणारा पाणीसाठा अगदी काही दिवसांतच संपुष्टात येईल, अशी परिस्थिती आहे.