सातारा : पवारांचे ऐकून घ्यायला आम्ही दूधखुळे नाही : लक्ष्मण माने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2018 05:27 PM2018-11-10T17:27:53+5:302018-11-10T17:30:18+5:30
पवारांचे ऐकून निर्णय घ्यायला आम्ही दुधखुळे नाही. अनेक निर्णयांमध्ये पवार आमचा सल्ला घेतात. आम्ही नाही तर पवारच आमचे ऐकतात. त्यांच्या सल्ल्याने वंचित आघाडीची वाटचाल सुरु असल्याची चर्चा फोल आहे, असे स्पष्टीकरण वंचित बहुजन महाआघाडीचे राज्य प्रवक्ते लक्ष्मण माने यांनी केले.
सातारा : पवारांचे ऐकून निर्णय घ्यायला आम्ही दुधखुळे नाही. अनेक निर्णयांमध्ये पवार आमचा सल्ला घेतात. आम्ही नाही तर पवारच आमचे ऐकतात. त्यांच्या सल्ल्याने वंचित आघाडीची वाटचाल सुरु असल्याची चर्चा फोल आहे, असे स्पष्टीकरण वंचित बहुजन महाआघाडीचे राज्य प्रवक्ते लक्ष्मण माने यांनी केले.
येथील विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. माने म्हणाले, जातीयवादी पक्षांना बाजूला सारुन आम्ही काँग्रेस, राष्ट्रवादी व डाव्या विचारांच्या पक्षांशी मैत्रीसाठी हात पुढे केले आहेत. जून महिन्यांपासून आम्हाला चर्चेला बोलावले जाईल, याच्या प्रतीक्षेत आहोत.
विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष याबाबत वेगवेगळी वक्तव्य करताना दिसत आहेत. राष्ट्रवादीचे नेते आमदार अजित पवार मात्र मैत्रीसाठी इच्छूक आहेत. आमच्याकडे सोयीस्कर पर्याय येणे आवश्यक आहे. १२ जागांची मागणी आम्ही केलेली आहे. ज्यांना वाटते की आम्हाला नादी लावणे सोपे आहे, त्यांनी हे लक्षात घ्यावे की आता दिवस बदलले आहेत.
वंचित आघाडीला कुठल्या जागा हव्यात, याबाबत स्पष्टीकरण करताना माने म्हणाले, ज्या मतदारसंघात राष्ट्रवादी व काँग्रेसचे उमेदवार तीन ते चार वेळा पराभूत झाले आहेत, पुन्हा निवडून येण्याची शक्यताही नाही, अशाच जागा आम्ही मागत आहोत. गरीब लोकांनीच भाजपला सत्तेवर आणले आहे. आता हेच लोक भाजपला सत्तेवरुन खाली खेचतील.
एमआयएमशी केलेली युती कुठल्याही परिस्थितीत तोडणार नाही, असे स्पष्ट करत माने यांनी आरएसएसवर तोफ डागली. एमआयएम पक्ष हा जातीयवादी म्हणणाऱ्या आरएसएसच्या सर्टिफिकेटची आम्हाला गरज नाही. मुस्लिम, ख्रिश्चन हे भारतीय नागरिक आहेत, हे मानायला आरएसएस तयार नाही, मात्र आम्ही मुस्लिम, मराठा, ओबीसींसह सर्वच वंचितांना सोबत घेणार आहोत, असेही माने यांनी सांगितले.
वंचित आघाडी १२ जागांवर ठाम
काँग्रेस, राष्ट्रवादीसोबतच जे डाव्या विचारसरणीचे पक्ष आहेत, त्यांच्याशी आघाडी करण्यासाठी वंचित बहुजन आघाडी इच्छूक आहे. आम्ही जून महिन्यात काँग्रेसकडे प्रस्ताव सादर केला होता. १२ जागांची आम्ही मागणी केली आहे, काँग्रेसने जर याबाबत नकार दर्शविला तर आम्ही स्वतंत्रपणे ४८ जागांवर उमेदवार उभे करुन लोकसभा निवडणूक लढवू, असा इशाराही माने यांनी दिला आहे.