सातारा : वीज जाताच काळजात होते धस्स...! शेतकरी चिंताग्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2018 01:42 PM2018-03-27T13:42:57+5:302018-03-27T13:42:57+5:30
वीज वितरण कंपनीने वर्ये फिडरवर रोज साडेचार तासांचे अघोषित भारनियम सुरु केले असल्याने शेतकरी चिंतेत आहेत. गेल्या १५ दिवसांपासून ऐन उन्हाळ्यात परिक्षेचा काळ असतानाही वीज बंद केली जात आहे. वीज भारनियमनामुळे शेतातील उभी पिकेही करपू लागली असून वीज जाताच लोकांच्या काळजात धस्स होत आहे.
सातारा : वीज वितरण कंपनीने वर्ये फिडरवर रोज साडेचार तासांचे अघोषित भारनियमन सुरु केले असल्याने शेतकरी चिंतेत आहेत. गेल्या १५ दिवसांपासून ऐन उन्हाळ्यात परिक्षेचा काळ असतानाही वीज बंद केली जात आहे. वीज भारनियमनामुळे शेतातील उभी पिकेही करपू लागली असून वीज जाताच लोकांच्या काळजात धस्स होत आहे.
जिल्ह्यात कुठेही भारनियमन घोषित केलेले नाही. तरी देखील काही भागांत जाणीवपूर्वक वीज घालविण्याचे प्रकार होत आहेत. ह्यवर्ये फिडरची वीज गळती जास्त आहे, असे कारण पुढे करुन भारनियमनचा आसूड ओढला जात आहे.
गेल्या पंधरा दिवसांपासून रामनगर, वर्ये, पानमळेवाडी, सैदापूर, कोंडवे, नेले, किडगाव, धावडशी, पिंंपळवाडी, म्हसवे या गावांत रोज सकाळी ८ ते दुपारी २.३0 असे साडेचार तासांचे भारनियमन सुरु आहे.
या परिसरात शेती क्षेत्र मोठ्या प्रमाणावर आहे. वेण्णा नदी याच परिसरातून वाहत असल्याने शेतीमध्ये बागायती पिके तसेच ऊसाची लागणही मोठ्या प्रमाणावर करण्यात आलेली आहे. या पिकांना पाणी लागते. पाण्याविना पिके करपू लागली आहेत. भारनियमनामुळे पाणी देता येत नसल्याने शेतकऱ्यांची अडचण निर्माण झाली आहे.
दरम्यान, उन्हाळ्याची तीव्रता वाढत असल्याने उकाड्यापासून बचावासाठी पंखे, एअर कुलरचा वापर केला जातो, यासाठी वीज लागते. मात्र वीजच नसल्याने ही यंत्रणा बंद पडून लोकांचे हाल होताना दिसत आहेत.
मुलांच्या परीक्षेचा कालावधी सुरु आहे, त्यातच या परिसरातील बहुतांश गावांच्या यात्रा सध्या सुरु असल्याने वीज महत्त्वाची ठरते. मात्र याचा विचार भारनियमन करताना केलेला दिसत नाही. हॉटेल व्यावसायिकांचे फ्रिज बंद राहत असल्याने पाणी, कोल्ड्रिंक्स थंड ठेवण्यासाठी व्यावसायिक बर्फाच्या लाद्या विकत आणताना दिसत आहेत.
वेळेत बिले भरणाºयांवरही अन्याय
वर्ये फिडरच्या माध्यमातून ज्यांना वीज मिळते, त्यापैकी बहुतांश ग्राहक हे वेळेत वीज बिल भरतात, मग वीज गळतीचे पाप त्यांच्या माथी मारण्याचे कारस्थान का खेळले जात आहे?, तसेच इथली वीज वाचवून दुसरीकडे तिचा वापर केला जात आहे का?, असे प्रश्न वीज ग्राहकांना पडले आहेत.
एका विहिरीवरुन वार लावून पाणी घ्यावे लागते. साहजिकच अनेक शेतकरी एकाच विहिरीच्या पाण्यावर अवलंबून असतात. रोज साडेचार तास सक्तीने वीज जात असल्याने पिकांना पाणी देण्यात अडचणी येत आहेत.
- संभाजी पवार,
शेतकरी