सातारा : युतीचा उमेदवार कोण? आज फैसला - शिवसेनेची मुंबईत बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2019 11:38 PM2019-03-15T23:38:19+5:302019-03-15T23:44:46+5:30

सातारा लोकसभा मतदार संघावर भाजप व शिवसेना या दोन्ही पक्षांनी दावा सांगितला आहे. या परिस्थितीत हा मतदारसंघ कुणाला मिळणार, याबाबत तर्कवितर्क लढवले जात असून, शनिवारी

Satara: Who is the candidate of the alliance? Today's decision - Shiv Sena's Mumbai meeting | सातारा : युतीचा उमेदवार कोण? आज फैसला - शिवसेनेची मुंबईत बैठक

सातारा : युतीचा उमेदवार कोण? आज फैसला - शिवसेनेची मुंबईत बैठक

Next
ठळक मुद्देनरेंद्र पाटील, पुरुषोत्तम जाधव, चंद्रकांत जाधव मुंबईला रवाना

सागर गुजर ।
सातारा : सातारा लोकसभा मतदार संघावर भाजप व शिवसेना या दोन्ही पक्षांनी दावा सांगितला आहे. या परिस्थितीत हा मतदारसंघ कुणाला मिळणार, याबाबत तर्कवितर्क लढवले जात असून, शनिवारी शिवसेनेची मुंबईत सेना भवनात बैठक होणार आहे. या बैठकीतच निर्णय होण्याची शक्यता आहे.

हा मतदारसंघ पारंपरिक शिवसेनेकडे होता, मागील निवडणुकीत भाजप, शिवसेना, आरपीआय, स्वाभिमानी शेतकरी संघटना, रासप यांच्यात युती झाल्यानंतर साताऱ्याचा मतदारसंघ आरपीआयने मागितला. शिवसेनेने तो आरपीआयला दिला. यंदाच्या निवडणुकीत शिवसेनेला २२ जागा देण्यात आल्या आहेत, तर भाजपला २३ जागा असे वाटप करण्यात आले आहे. भाजपने पालघर मतदारसंघ शिवसेनेला सोडला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटना आता मित्र पक्ष राहिला नसल्याने शिवसेना हातकणंगले मतदारसंघ लढणार आहे. नांदेड, बारामती, माढा हे वाढीव मतदारसंघ भाजपकडे राहिले आहेत.

मागील निवडणुकीत शिवसेनेने सातारा लोकसभा मतदारसंघ मित्र पक्षाला सोडला होता. आता राजकीय परिस्थिती ओळखून हा मतदारसंघ भाजपने मागितला आहे. याबाबतचा प्रस्ताव वरिष्ठ नेत्यांकडे पाठविण्यात आला असून, शिवसेनेनेही हा मतदारसंघ आपल्याकडेच राहावा, यासाठीचा प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठविला आहे.

उमेदवारी वाटपाबाबत शिवसेना-भाजपमध्ये मॅरेथॉन बैठका सुरू आहेत. भाजपला हा मतदारसंघ मिळेल, अशी आशा जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, शिवसेनेतून पुरुषोत्तम जाधव, चंद्रकांत जाधव यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता असल्याने या दोघांनी शनिवारच्या बैठकीसाठी मुंबईला प्रस्थान केले आहे. भाजपमधून इच्छुक असणारे नरेंद्र पाटील यांनी शुक्रवारी जावळी तालुक्यातील कार्यकर्त्यांच्या भेटी-गाठी घेऊन मुंबईकडे प्रस्थान केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे उमेदवारीबाबत काय निर्णय घेतात?, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. .
 

युतीची माझी उमेदवारी निश्चित आहे. शनिवारी मुख्यमंत्र्यांनी बोलावून घेतले आहे. जावळीतील भेटी-गाठी उरकून मी आता मुंबईला जाणार आहे. वरिष्ठ पातळीवरून आदेश झाल्यानंतरच सविस्तर बोलता येईल.
- नरेंद्र पाटील, अध्यक्ष, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ

सातारा लोकसभा मतदारसंघ भाजपकडे असावा, अशी मागणी केली आहे. कार्यकर्त्यांची तशी तीव्र इच्छा आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे आम्ही मागणी केली आहे. नेते याबाबत दोनच दिवसांत निर्णय घेतील.
- विक्रम पावसकर, जिल्हाध्यक्ष भाजप्

शिवसेना-भाजपच्या युतीतून मी निवडणूक लढली. त्यानंतर मागील निवडणूकही लढली. निवडणुकीनंतर जिल्हाभर संपर्क ठेवला. १९९७ ची पुनरावृत्ती करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. नेत्यांनी मला मुंबईला बोलावून घेतले आहे.
- पुरुषोत्तम जाधव

निष्ठावंत शिवसैनिकालाच उमेदवारी मिळाली पाहिजे, अशी जिल्ह्यातील शिवसैनिकांची मागणी आहे. पक्षाने यापूर्वी पानपट्टी व्यावसायिक, रिक्षाचालक यांना खासदार केले आहे, त्यामुळे सातारा लोकसभेची उमेदवारी देत असताना पैसे खर्च करण्याचा निकष लागला जाऊ नये, अशी आमची इच्छा आहे.
- चंद्रकांत जाधव, जिल्हाप्रमुख शिवसेना

Web Title: Satara: Who is the candidate of the alliance? Today's decision - Shiv Sena's Mumbai meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.