सातारा : युद्ध जिंकलं आता विजयाचे नगारे, वॉटर कप स्पर्धा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2018 02:34 PM2018-05-23T14:34:00+5:302018-05-23T14:34:00+5:30
सातारा जिल्ह्यातील दीडशेहून अधिक गावांत मनसंधारणातून वॉटर कप स्पर्धेचं मोठं काम उभं राहिलं असून, लोकांनी हे युद्ध जिंकलं आहे. आता पावसाचं पाणी साठल्यानंतर विजयाचे नगारे वाजवणं बाकी राहिलं आहे. दुष्काळाच्या गर्तेत सुरू असणारं हे काम पाणीदार पहाट घेऊनच येणार याचा लोकांना पूर्ण विश्वास आहे.
नितीन काळेल
सातारा : जिल्ह्यातील दीडशेहून अधिक गावांत मनसंधारणातून वॉटर कप स्पर्धेचं मोठं काम उभं राहिलं असून, लोकांनी हे युद्ध जिंकलं आहे. आता पावसाचं पाणी साठल्यानंतर विजयाचे नगारे वाजवणं बाकी राहिलं आहे. दुष्काळाच्या गर्तेत सुरू असणारं हे काम पाणीदार पहाट घेऊनच येणार याचा लोकांना पूर्ण विश्वास आहे.
गेल्या तीन वर्षांपासून सुरू झालेली वॉटर कप स्पर्धा खूप मोठं परिवर्तन करून गेली आहे. या स्पर्धेमुळं प्रथम गावे एक झाली. अनेक वर्षांचे वैर मैत्रीत बदलले. त्यामुळे मनसंधारण झाल्याने जलसंधारणाचे काम मोठ्या प्रमाणात झाले.
यंदाच्या तिसऱ्यावर्षी तर सातारा जिल्ह्यात छोट्या धरणात पाणीसाठा होईल ऐवढे जलसंधारणाचे काम झालं आहे. ४५ दिवसांच्या या काळात लोकांनी श्रमदान तर केलेच; पण यथाशक्ती कामासाठी मदतही केली. हे पाहूनच विविध संस्था, चाकरमानी, अधिकाºयांनी स्पर्धेतील गावांसाठी सर्वतोपरी मदत केली.
श्रमदानाच्या ठिकाणी धडधाकट व्यक्ती आल्या तसेच दिव्यांग लोकांनीही आपल्या परीने श्रमदानात हातभार लावला. अंगाची हळद निघण्यापूर्वीही अनेक नवदाम्पत्यांनी हाती खोरे, पाटी घेतली. वर्षानुवर्षांचे राजकीय वैर विसरून अनेक राजकीय लोकांनी हातात हात घेऊन श्रमदान केले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, सुनील तटकरे, पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, धनंजय मुंडे, आमदार जयकुमार गोरे, माजी आमदार प्रभाकर घार्गे, जिल्हा बँकेचे संचालक अनिल देसाई यांच्याबरोबर इतर पदाधिकाºयांनीही लोकांचा उत्साह वाढविण्यासाठी प्रयत्न केले.
शरद पवार यांनी तर माण, खटाव तालुक्याच्या दौऱ्यात वॉटर कपसाठी सहा कोटी रुपयांचा निधी मिळवून दिला. जिल्ह्यातील वॉटर कप स्पर्धेतील गावांनी लोकसहभाग व संस्थांच्या माध्यमातून ७ कोटींहून अधिक निधी जमवला. भारतीय जैन संघटनेनेही सुमारे ३०० जेसीबी आणि पोकलेनची व्यवस्था केली होती. हे सारे सुरू होते ते दुष्काळी गावे पाणीदार करण्यासाठीच.
आता ही स्पर्धा संपली असून, पावसाची प्रतीक्षा गावांना लागली आहे. यावर्षी वॉटर कप स्पर्धेंतर्गत मोठे काम झाले आहे. त्यामुळे पाणीदार गाव होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
काम संपल्यानंतर चिलारवाडीत गजीनृत्य...
वॉटर कप स्पर्धा संपल्यानंतर माण तालुक्यातील चिलारवाडीत ग्रामस्थांनी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. रात्रीच्या सुमारास झालेल्या या कार्यक्रमात पुरुषांनी गजीनृत्य सादर केले तर महिलांनी टिपऱ्या खेळल्या. तसेच पारंपरिक गीते गाऊन कबड्डीचा खेळही रंगला.
- - माण तालुक्यातील दौऱ्यात शरद पवार यांनी नांगर हाती धरला
- - मंत्री महादेव जानकर यांनीही श्रमदान करून उत्साह वाढवला
- -मंत्री सदाभाऊ खोत यांचे दिवडमध्ये श्रमदान
- -अभिनेता अक्षयकुमारचं पिंपोडे बुद्रुकमध्ये श्रमदान व गावाला २५ लाखांची मदत
- - पांगरीत किरण राव यांची गजी नृत्यावर पावलं थिरकली
- - तळियेतील सुनीता गायकवाड यांची एक हात नसतानाही श्रमदानासाठी मदत
- - चिलारवाडीत वृद्धांनी खांद्यावर घागर आणून पुरवले पाणी
- - कटगुणला पहिल्याच दिवशी ५०० मीटरचे शेततळे व माती बांध पूर्ण
- - बनवडीत यात्रेचा खर्च जलयुक्तच्या कामासाठी
- - कुकुडवाडला श्रमदानाच्या ठिकाणी मोफत वैद्यकीय सेवा
- - धामणीत १६ मिनिटांत ६ लूज बोल्डर तयार
- - कुकुडवाडला देवदर्शनापूर्वी नवदामप्त्याच्या हाती खोरं अन् पाटी
- - उंब्रजच्या महिलांचे तळियेत येऊन श्रमदान
- - निमसोडमधील कामासाठी अमेरिकेतूनही मदत
- - कळस्करवाडीत महिलेकडून पतीच्या पुण्यतिथीचा खर्च गावातील कामासाठी