साताऱ्यात महिलेचे १९ तोळ्याचे दागिने हिसकावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2019 11:47 AM2019-05-28T11:47:11+5:302019-05-28T11:48:33+5:30
नातेवाईकांसमवेत मुंबईला निघालेल्या महिलेचे १९ तोळ्याचे दागिने अन् ३१ हजारांची रोकड असलेली पर्स हिसकावून नेल्याची खळबळजनक घटना रविवारी रात्री सव्वानऊच्या सुमारास बसस्थानक पाठीमागील पारंगे चौकात घडली.
सातारा : नातेवाईकांसमवेत मुंबईला निघालेल्या महिलेचे १९ तोळ्याचे दागिने अन् ३१ हजारांची रोकड असलेली पर्स हिसकावून नेल्याची खळबळजनक घटना रविवारी रात्री सव्वानऊच्या सुमारास बसस्थानक पाठीमागील पारंगे चौकात घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, माया विलास लादे (वय ५३,रा. सध्या रा. कांदिवली, मुंबई, मूळ रा. सासपडे, ता. सातारा) या रविवारी रात्री नातेवाईकांसमवेत मुंबईला निघाल्या होत्या. मुंबईला जाण्यासाठी पारंगे चौकामध्ये लक्झरी बस उभ्या असतात. या लक्झरी बसकडे त्या चालत जात असतानाच पाठीमागून दुचाकीवरून एक युवक भरधाव आला. काही कळायचा आतच त्याने लादे यांच्या खांद्याला अडकवलेली पर्स हिसकावून पलायन केले.
त्यांच्या पर्समध्ये १९ तोळ्यांचे दागिने आणि ३१ हजार ५०० रुपयांची रोकड असा सुमारे अडीच लाखांचा ऐवज होता. लादे यांनी या प्रकारानंतर आरडाओरड केली. मात्र, संबंधित चोरटा सूसाट पळून गेला. रविवारी सुटीचा दिवस असल्यामुळे पारंगे चौकामध्ये मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांची प्रचंड गर्दी होती. या गर्दीचा फायदा घेऊन चोरट्याने दागिन्यांची पर्स हिसकावून नेली. काही नागरिकांनी या प्रकाराची माहिती पोलिसांना दिली.
पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन परिसराची नाकाबंदी केली. तसेच वायरलेसवरून शहरातून बाहेर जाणाऱ्या रस्त्यांची नाकाबंदी करण्याचे आदेशही पोलिसांना देण्यात आले. रात्री अकरापर्यंत पोलिसांकडून ठिकठिकाणी तपासणी सुरू होती. मात्र, दागिने हिसकावून पळालेला चोरटा अखेर सापडलाच नाही. दरम्यान, परिसरातील सीसीटीव्ही तपासण्याचे कामही पोलिसांनी सुरू केले आहे.