सातारा : भिंत अंगावर पडल्याने महिला ठार; दोघे जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2018 02:35 PM2018-05-28T14:35:57+5:302018-05-28T14:35:57+5:30
वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने फलटणसह विडणी, अब्दागिरी, धुळदेव, गणेशशेरीला झोडपून काढले. झिरपवाडीत मध्यरात्री पाऊणच्या सुमारास भिंत अंगावर पडल्याने छाया साहेबराव जाधव (वय ५२) ही महिला ठार झाली.
फलटण/वाठार निंबाळकर : वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने फलटणसह विडणी, अब्दागिरी, धुळदेव, गणेशशेरीला झोडपून काढले. झिरपवाडीत मध्यरात्री पाऊणच्या सुमारास भिंत अंगावर पडल्याने छाया साहेबराव जाधव (वय ५२) ही महिला ठार झाली.
सोनवडीत दोघे जखमी झाले. विडणी येथील उत्तरेश्वर रोपवाटिकेचे सहा सेड जमीनदोस्त झाले. सेडनेट, कागद, पॉलीहाऊस, भिंती, रोपांच्या सहा शेडचे नुकसान झाले. यामुळे ४७ लाखांचे नुकसान झाले.
पुणे-पंढरपूर रस्त्यावरील गणेशशेरी, धुळदेव, विडणी, अब्दागिरीवाडी येथे रस्त्याकडेची मोठमोठी झाडे उन्मळून पडली. त्यामुळे रस्ता रात्रभरासाठी बंद पडला. त्यामुळे वाहनचालकांची तारांबळ उडाली. दुचाकी, चारचाकी वाहने मिळेल त्या मार्गाने मार्गस्थ झाली. मात्र एसटी, ट्रक व इतर वाहने रात्रभर अडकून पडली.
धुळदेव येथील जालिंदर भिवरकर यांच्या घरावरील पत्रे वाऱ्यांने उडून गेले. घर, भिंतीचे वीस हजारांचे नुकसान झाले. घरासमोर साठवून ठेवलेल्या कांद्याचे नुकसान झाले. धनंजय ननावरे यांचा कांदा भिजल्याने सत्तर हजारांचे नुकसान झाले.
आंबा, लिंबू, केळी, डाळिंबी आदींची झाडे उन्मळून पडल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले. विडणीतील दत्तोपंत काळुखे यांच्या डाळिंबाचे लाखोंचे नुकसान झाले. टोमॅटो, वांगी, मिरची, गवार, मका, ऊस, द्राक्षे आदींचेही नुकसान झाले.
सोनवडी बुद्रुक येथील यशवंत तात्याबा खिलारे, सदाशिव खिलारे यांच्या घरावरील पत्रे वाºयाने उडले. यात पाच लाखाचे नुकसान झाले. यामध्ये सदाशिव खिलारे गंभीर जखमी झाले. विडणी अब्दागिरेवाडीतील रामचंद्र किसन अब्दागिरे यांच्या घरावरील पत्रे उडाले. यात दोन लाखांचे नुकसान झाले.
बाळासाहेब जिजाबा यांच्या घराची भिंत पडली. यामध्ये तीस हजारांचे नुकसान झाले. तर पांडुरंग धोंडिबा अब्दागिरे यांच्या घराचे पत्रे, भिंत पडल्याने एक लाखाचे नुकसान झाले.
वाठार निंबाळकर येथील दशरथ वाडकर यांच्या जनावरांच्या गोठ्यावरील पत्रे उडून व भिंती पडून सुमारे तीस हजार रुपयांचे नुकसान झाले.
विठ्ठल गेनबा ननावरे यांच्या घरावर झाड पडून घराचे चाळीस हजारोंचा नुकसान झाले. बाबा मारुती धायगुडे यांच्या घरावर झाड पडून तीस हजारांचे नुकसान झाले. अनेक ठिकाणी वीजवाहक तारा तुटल्या आहेत. तहसीलदार विजय पाटील यांनी नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले असून, पंचनामे सुरू आहेत.