सातारा : नवीन कास धरणाची उंची वाढविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2018 04:38 PM2018-05-19T16:38:00+5:302018-05-19T16:38:00+5:30
सातारा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या नवीन कास धरणाची उंची वाढविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. आत्तापर्यंत एकूण वीस टक्के काम पूर्ण झाले आहे.
सागर चव्हाण
पेट्री : सातारा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या नवीन कास धरणाची उंची वाढविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. आत्तापर्यंत एकूण वीस टक्के काम पूर्ण झाले आहे.
उरमोडी धरणाच्या उजव्या बाजूच्या तीरावर तलाव परिसरात साखळी क्रमांक १८० ते साखळी क्रंमाक ३४० मधील जलरोधी खंदक भरून पूर्ण करण्यात आला आहे.
यासाठी आत्तापर्यंत १.०५ लाख घनमीटर मातीचे खोदकाम करण्यात आले असून हा जलरोधी खंदक भरून गाभा भरावयाचे काम तलांक ११२५. ५८ मीटर उंचीपर्यंत करण्यात आले आहे. अर्थात जुन्या धरणाच्या तलाक उंचीपर्यंत काम पूर्ण झाले आहे.
साखळी क्रमांक १८ ते साखळी क्रमांक ७५ मधील जलरोधी खंदक भरून गॉर्ज फिलिंगचे काम प्रगतीपथावर असून, ते तलांक १११२.०० मीटरपर्यंत पूर्ण झाले आहे.
या साखळी क्रमांक १८० ते साखळी क्रमांक ७५ मधील जलरोधी खंदक भरण्याचे काम अजून ३ मीटर उंचीपर्यंत करून त्याला नैसर्गिक उतार देण्यात येणार असून, धरणाच्या सांडव्यावरून वाहणारे पाणी मूळ नदीपात्रात सोडण्यात येणार आहे. १११५ मीटर उंचीपर्यंत गॉर्ज फिलिंगचे काम पूर्ण झाल्यावर गॅबीयन पद्धतीने जाळीमध्ये दगडे भरून झाल्यावर गॉर्ज फिलिंगचे काम सुरक्षित करण्यात येणार आहे.
पाटाच्या पलीकडील साखळी क्रमांक ४५ते साखळी क्रमांक (-) १२० मधील जलरोधी खंदक खोदायचे काम पूर्णत्वाच्या टप्प्यावर असून, ते निर्धारित खोलीपर्यंत गेल्यानंतर तेथील जलरोधी खंदक भरण्याचे काम पावसाळ्यापूर्वी सुरू केले जाणार आहे.
धरणाची किडनी म्हणून ओळखल्या जाणाºया तीनशे मीटर लांब एल ड्रेन व क्रॉस ड्रेनचे काम सुरू असून, ते साखळी क्रमांक १८० ते साखळी क्रमांक ३४० मध्ये एल. ड्रेन भरून झाल्याने कवच भरावा व गाभा भरावा समतल करून एकजीविकरण करण्याचे काम प्रगतीपथावर आहे.
या जुन्या धरणाची पूर्ण संचय पातळी ११२२.३८ मीटर उंच इतकी आहे. तसेच नवीन धरणाची तलांक पातळी ११३४.०० मीटर उंच इतकी होणार आहे. भरावासाठी लाल माती टाकून भरावाचे काम वेगाने सुरू असून, ३० सेमी लेअर बाय लेयर भरून वॉटरिंग आणि रोलिंग सुरू आहे. या कामी २५ डंपर, २डोझर, २ रोलर व शंभर कर्मचाऱ्यांच्या मदतीने हे काम वेगाने सुरू असून, पावसाळ्यापूर्वी काम करण्यासाठीचे प्रयत्न सुरू आहेत.
गॉर्ज फिलिंग म्हणजे काय?
मूळ नदीपात्रात १०० फूट खोल खोदकाम करून जलरोधी खंदक भरण्याचे काम चालू आहे, यालाच गॉर्ज फिलिंग असे म्हणतात. झालेल्या भरावाच्या कामाला टँकरदवारे पाणी मारले जात आहे. मागील आठवड्यात कास तलाव परिसरात साधारण तासभर चांगला पाऊस पडला. यामुळे भरावाच्या कामाला नैसर्गिकरीत्या पाणी मिळून काम मजबूत होण्यास मदत झाली आहे.