डॉक्टर, नर्स झोपेत असताना तरुणाचा तडफडून मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2019 03:23 PM2019-12-01T15:23:04+5:302019-12-01T15:24:54+5:30
सिव्हिलमधील धक्कादायक प्रकार; हलगर्जीपणाचा नातेवाइकांचा आरोप
सातारा : एक बावीस वर्षीय तरुण तडफडत मृत्यूशी झुंज देत असताना सिव्हिलमधील डॉक्टर आणि परिचारिका मात्र मध्यरात्री गाढ झोपेत होते. अखेर नातेवाइकांनी परिचारिकांना झोपेतून उठवून तरुणावर उपचार करण्यास सांगितले. परंतु तोपर्यंत फार उशीर झाला होता. संबंधित तरुणाने अक्षरश: तडफडून अखेर प्राण सोडले. या धक्कादायक प्रकारामुळे नातेवाइकांमधून तीव्र संताप व्यक्त होत असून, डॉक्टर व कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे युवकाचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाइकांनी केला आहे.
विनायक बाळकेश्वर शिंगनाथ (वय २२, रा. केसरकर पेठ, सातारा) हा औद्योगिक वसाहतीमधील एका कंपनीत काम करत होता. शनिवारी दुपारी दोनच्या सुमारास अचानक त्याला उलटी झाली आणि पोटातही दुखू लागले. त्यामुळे तो दुचाकीवरून स्वत: जिल्हा शासकीय रुग्णालयात गेला. डॉक्टरांनी त्याला तपासल्यानंतर त्याला अॅडमिट व्हावे लागेल, असा सल्ला दिला. सिव्हिलमधील वॉर्ड क्रमांक दोनमध्ये त्याला अॅडमिट करण्यात आले. सलाईन आणि इंजेक्शनद्वारे त्याच्यावर उपचार सुरू झाले. रुग्णालयात त्याच्यासोबत त्याचा भाऊ गणेश हा थांबला होता. इतर नातेवाईक घरी गेले होते.
दरम्यान, रविवारी रात्री अडीचच्या सुमारास अचानक पुन्हा विनायकच्या पोटात दुखू लागले आणि जुलाबही होऊ लागले. त्यावेळी वॉर्डमध्ये परिचारिका व डॉक्टर कोणीच नव्हते. वॉर्डच्या बाहेर एका खुर्चीवर कपाऊंडर डुलक्या घेत होता. विनायकचा भाऊ गणेशने त्याला झोपेतून उठवले. तोपर्यंत विनायकची प्रकृती अत्यंत चिंताजनक बनली. परिचारिका व डॉक्टर दुसरीकडे गाढ झोपेत होते. त्यांना उठवण्यासाठी कंपाऊंडर गेला. त्यानंतर एका परिचारिकेने येऊन त्याला सलाईन लावले.
भावाची अवस्था पाहून भांबावून गेलेल्या गणेशने हा प्रकार घरच्यांना सांगितला. केवळ पाच मिनिटांतच सर्व नातेवाईक सिव्हिलमध्ये आले. परंतु गाढ झोपलेले परिचारिका आणि डॉक्टर आले नाहीत. नातेवाइकांनीच त्यांना झोपेतून उठवले. विनायकवर उपचार सुरू झाले; परंतु त्याचा काहीएक उपयोग झाला नाही. उपचारापूर्वीच त्याचा अखेर मृत्यू झाला.
विनायकचा मृत्यू झाल्याची माहिती समजल्यानंतर त्याच्या नातेवाईक व मित्रांनी सिव्हिलमध्ये गर्दी केली. त्यामुळे तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. पोलिसांनी तत्काळ धाव घेऊन जमावाला शांत केले. गणेश शिंगनाथ याने पोलिसांना तक्रार अर्ज दिल्यानंतर नातेवाइकांनी मृतदेह ताब्यात घेतला.
झोपेतून उठताना रेकॉर्डिंग
गाढ झोपलेल्या परिचारिका आणि डॉक्टरांचे संतप्त झालेल्या नातेवाइकांनी मोबाईलवर रेकॉर्डिंग सुरू केले. त्यावेळी झटपट झोपेतून सर्वजण उठले. काहीजणांनी तोंड लपवले. संतप्त नातेवाइकांच्या रोषाला त्यांना सामोरे जावे लागले. या प्रकाराची चौकशी होऊन संबंधितांवर कारवाई व्हावी, अशी मागणी नातेवाइकांनी केली आहे.