पंचायत सशक्तीकरणमध्ये दुसऱ्या वर्षीही सातारा जिल्हा परिषद राज्यात प्रथम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 04:41 AM2021-04-02T04:41:19+5:302021-04-02T04:41:19+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : पंडित दीनदयाळ पंचायत सशक्तीकरण पुरस्कारांमध्ये सातारा जिल्हा परिषदेने सलग दुसऱ्यावर्षी राज्यात प्रथम क्रमांक मिळवला. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : पंडित दीनदयाळ पंचायत सशक्तीकरण पुरस्कारांमध्ये सातारा जिल्हा परिषदेने सलग दुसऱ्यावर्षी राज्यात प्रथम क्रमांक मिळवला. यामुळे जिल्हा परिषदेला ५० लाख रुपयांचे बक्षीस मिळाले आहे. केंद्र शासनाच्या या पुरस्कारामुळे सातारा जिल्ह्याचा डंका देशपातळीवर पुन्हा वाजला आहे, तर जिल्ह्यातील मान्याचीवाडी आणि देगाव ग्रामपंचायतीलाही पुरस्कार मिळाला असून, प्रत्येकी दहा लाखांचे बक्षीस मिळाले आहे.
केंद्र शासनाने पंडित दीनदयाळ पंचायत सशक्तीकरण पुरस्कारासाठी १०० गुणांची प्रश्नावली निश्चित केली होती. यामध्ये स्वच्छता, नागरी सुविधा, नैसर्गिक साधनसंपत्तीचे व्यवस्थापन, ई-गव्हर्नन्स आदिमध्ये काम केल्यानंतर स्वयंमूल्यांकन करून प्रश्नावली ऑनलाइन भरण्यात आली होती. त्यानंतर महाराष्ट्र शासनाने रायगड जिल्हा परिषदेच्या मार्फत राज्यस्तर क्षेत्रीय तपासणी केली होती. ही तपासणी जानेवारी महिन्यामध्ये झाली होती. यानंतर राज्य शासनाने केंद्राकडे माहिती पाठविली. याबाबत गुरुवारी पुरस्कार जाहीर करण्यात आला. यामध्ये सातारा जिल्हा परिषदेला पंडित दीनदयाळ पंचायत सशक्तीकरणमध्ये राज्यात प्रथम क्रमांक जाहीर करण्यात आला. जिल्हा परिषदेला ५० लाखांचे बक्षीस मिळणार आहे, तर पाटण तालुक्यातील मान्याचीवाडी आणि वाई तालुक्यातील देगाव ग्रामपंचायतीलाही ग्रामपंचायतस्तरावर हा पुरस्कार मिळाला आहे.
पुरस्कार प्रस्तावासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, सामान्य प्रशासनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जाधव, ग्रामपंचायतचे अविनाश फडतरे यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख यांचे सहकार्य लाभले, तर सांख्यिकीचे विस्तार अधिकारी महेंद्र देशमुख, सहाय्यक प्रशासन अधिकारी नितीन दीक्षित, कनिष्ठ प्रशासनाधिकारी सुधाकर कांबळे यांच्यासह विविध विभागातील कर्मचाऱ्यांनी नियोजन केले.
या यशाबद्दल जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले, उपाध्यक्ष प्रदीप विधाते, शिक्षण समिती सभापती मानसिंगराव जगदाळे, कृषी सभापती मंगेश धुमाळ, समाजकल्याण सभापती कल्पना खाडे, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती सोनाली पोळ आदींनी अभिनंदन केले.
चौकट : मान्याचीवाडीचा दुहेरी डंका...
केंद्र शासनाच्या पंडित दीनदयाळ पंचायत सशक्तीकरणमध्ये सर्वसाधारण कॅटेगरीत देशपातळीवर मान्याचीवाडी आणि देगाव ग्रामपंचायतींनी स्थान मिळवले आहे. या दोन्ही गावांना प्रत्येकी दहा लाखांचे बक्षीस मिळणार आहे तर मान्याचीवाडी ग्रामपंचायतीला नानाजी देशमुख राष्ट्रीय गौरव ग्रामसभा पुरस्कारही मिळाला आहे. याबद्दलही दहा लाखांचे बक्षीस मिळणार आहे. मान्याच्यावाडी गावाने दुहेरी डंका वाजवला आहे.
कोट :
पंडित दीनदयाळ पंचायत सशक्तीकरणमध्ये सातारा जिल्हा परिषदेला सलग दुसऱ्यावर्षी पुरस्कार मिळाला आहे. यामुळे जिल्ह्याचा नावलौकिक आणखी वाढला आहे. जिल्हा परिषदेचे पदाधिकारी, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नातूनच हा पुरस्कार मिळाला. त्याचबरोबर जिल्ह्यातील दोन ग्रामपंचायतींनीही पुरस्कार मिळवत डंका वाजविला आहे. सर्वांच्या योगदानातूनच हे साध्य झाले आहे.
- उदय कबुले, अध्यक्ष, जिल्हा परिषद
.......
पंडित दीनदयाळ पंचायत सशक्तीकरणमध्ये सातारा जिल्हा परिषद आणि जिल्ह्यातील दोन ग्रामपंचायतींनी यश मिळवून जिल्ह्याचा नावलौकिक आणखी वाढवीला आहे. पदाधिकारी, अधिकारी यांच्या टीम वर्कमुळेच हे यश मिळाले आहे. जिल्हा परिषदेने आतापर्यंत अनेक उपक्रम, स्पर्धांमध्ये यश मिळवले. यामुळे सातारा जिल्ह्याचा डंका देशपातळीवर सतत वाजत आहे.
- विनय गौडा, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सातारा
.........................................................................