तीन आठवड्यांत ३६ हजार घरकुलांना मंजुरी!, सातारा जिल्हा परिषदेची दमदार कामगिरी
By नितीन काळेल | Updated: February 28, 2025 13:37 IST2025-02-28T13:03:20+5:302025-02-28T13:37:00+5:30
आता ३१ मेपर्यंत पूर्ण करण्याची डेडलाइन

तीन आठवड्यांत ३६ हजार घरकुलांना मंजुरी!, सातारा जिल्हा परिषदेची दमदार कामगिरी
नितीन काळेल
सातारा : घरकुलमधील प्रधानमंत्री आवास योजनेमधून सर्वाधिक घरांची तरतूद आहे. या योजनेतून सातारा जिल्ह्यात सहा वर्षांत १४ हजारांवर घरे मंजूर झाली; पण आताच्या टप्पा दोनमध्ये या योजनेतूनच तब्बल ३६ हजार घरकुलांना अवघ्या तीन आठवड्यांत मंजुरी देण्यात आली. त्यातील २५ हजार लाभार्थ्यांना पहिला हप्ताही मिळाला आहे. जिल्हा परिषदेची ही कामगिरी दमदार ठरली आहे.
प्रधानमंत्री आवास हा केंद्र शासनाचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम आहे. याचाच एक भाग म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकार स्थापन झाल्यानंतर १०० दिवसांचा कृती कार्यक्रम जाहीर केला होता. या कार्यक्रमानुसार राज्यात २० लाख घरकुलांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यामध्ये सातारा जिल्ह्याला प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोनमधून ४५ हजार ४२२ एवढ्या मोठ्या संख्येने घरकुलांचे उद्दिष्ट प्राप्त झाले आहे. त्यानंतर ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी जानेवारी महिन्यातच साताऱ्यात पत्रकार परिषद घेऊन पुढील १०० दिवसांत जिल्ह्यातील सर्व घरकुलांना मंजुरी देण्याचा विश्वास व्यक्त केला होता. हा विश्वास जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी सार्थ ठरवला आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांच्या मार्गदर्शनाखाली घरकुलांना मंजुरी देण्यासाठी यंत्रणा राबवली. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे अधिकारी, कर्मचारी आणि तालुकास्तरावरील अधिकारी, ग्रामपंचायतीमधील अधिकाऱ्यांच्या मदतीने अवघ्या तीन आठवड्यांतच जिल्ह्यातील ३६ हजार ६८३ घरकुलांना मंजुरी देण्यात यश आले. यासाठी अधिकाऱ्यांनी दिवसाबरोबरच रात्रीही काम केले. त्यामुळे राज्यात सातारा जिल्हा आघाडीवर राहिला. तर मंजूर घरकुलांपैकी २५ हजार १७५ लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर १५ हजार रुपयांचा पहिला हप्ताही जमा झाला आहे. त्यामुळे लाभार्थ्यांनी घरकुलाचे कामही सुरू केले आहे. प्रधानमंत्री आवास टप्पा दोनमधील घरकुलांमुळे जिल्ह्यात आता बेघर असणाऱ्यांची संख्या एकदम कमी झाली आहे. उर्वरित पात्र लोकांनाही घरकुल मिळणार आहे. त्यासाठी लवकरच सर्व्हेही सुरू होणार आहे.
प्रधानमंत्री घरकुल टप्पा दोन घरकुल मंजूर..
तालुका - मंजुरी पत्र - वितरण प्रथम हप्ता जमा
पाटण - ७,३४४ - ४,५०५
सातारा - ५,०४३ - २,७९९
कऱ्हाड - ४,७०५ - ३,८७६
खटाव - ३,९४० - २,९९८
कोरेगाव - ३,४१३ - २,०३४
फलटण - ३,३९२ - २,१४०
माण - ३,०२९ - २,३८८
जावळी - १,९०३ - १,२४१
वाई - १,७९३ - १,३८५
खंडाळा - १,३६६ - १,०५२
महाबळेश्वर - ८५५ - ७५७
एकूण - ३६,६८३ - २५,१७५
आता ३१ मेपर्यंत पूर्ण करण्याची डेडलाइन..
सातारा जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास ग्रामीण टप्पा दोनमधून आतापर्यंत ३६ हजार ६८३ घरकुलांना मंजुरी मिळाली आहे. ही घरकुले १०० दिवसांत म्हणजे ३१ मेपर्यंत पूर्ण करण्याबाबत नियोजन करण्यात आलेले आहे. त्यामुळे घरकुल मंजुरीप्रमाणेच बांधकामातही सातारा आघाडीवर राहणार आहे.