सोलर प्रकल्पासाठी गायरान जमिनी देणार, सातारा जिल्हा परिषदेत ठराव मंजूर
By नितीन काळेल | Published: August 28, 2023 07:25 PM2023-08-28T19:25:30+5:302023-08-28T19:25:56+5:30
शेतीला दिवसा वीज देण्यासाठी सोलर प्रकल्पातून वीज तयार करण्यात येणार
सातारा : जिल्हा परिषदेच्या ठराव समितीच्या सभेत प्राथिमक आरोग्य केंद्राची जुनी इमारत निर्लेखनावर चर्चा झाली. तसेच महत्वपूर्ण अशा सोलर प्रकल्पासाठी ग्रामपंचायतीकडील गायरान जमिनी देण्याबाबतचा महत्वपूर्ण ठरावही झाला. यामुळे शासनाच्या या प्रकल्पाला गती मिळणार आहे.
जिल्हा परिषदेच्या स्थायी समिती सभागृहात मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी यांच्या अध्यक्षतेखाली ठराव समितीची सभा झाली. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले, ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक संतोष हराळे, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश घुले, ग्रामपंचायत विभागाच्या अर्चना वाघमळे, पाणी व स्वच्छता विभागाच्या क्रांती बोराटे, महिला व बालकल्याण विभागाच्या रोहिणी ढवळे, जिल्हा कृषी विकास अधिकारी विजय माईनकर, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डाॅ. विनोद पवार, जिल्हा जलसंधारण अधिकारी अरुण दिलपाक, जिल्हा समाजकल्याण अधिकारी डाॅ. सपना घोळवे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी राहुल कदम, प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी शबनम मुजावर आदी उपस्थित होते.
या ठराव समिती सभेत सुरुवातीला १४ आॅगस्ट रोजी झालेल्या सभेचा कार्यवृत्तांत वाचून कायम करण्याबाबत विचार करण्यात आला. त्यानंतर याच सभेतील ठरावावरील कार्यवाहीचा आढावा घेण्यात आला. तर ग्रामपंचायत विभागाकडील जिल्हा ग्राम विकास निधीतून एक कोटी रुपयांच्या नवीन गुंतवणुकीबाबत चर्चा झाली. तसेच ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडील विषयांचा आढावाही घेण्यात आला. त्याचबरोबर कऱ्हाड तालुक्यातील वडगाव हवेली प्राथमिक आरोग्य केंद्राची जुनी इमारत आणि निवासस्थान निर्लेखनबाबत चर्चा करण्यात आली.
या सभेत सोलर प्रकल्पाविषयी महत्वपूर्ण निर्णय झाला. राज्य शासनाच्या वतीने शेतीला दिवसा वीज देण्यासाठी सोलर प्रकल्पातून वीज तयार करण्यात येणार आहे. यासाठी शेतकऱ्यांची तसेच शासकीय गायरान जमिनी घेण्यात येणार आहेत. यामध्ये गायरान जमिनीला प्राधान्य राहणार आहे. यासाठी ग्रामपंचायतीकडील गायरान जमिनी सोलर प्रकल्पासाठी देण्याबाबत ठराव मंजूर झाला. यामुळे आता ग्रामपंचायतीला या जमिनी प्रकल्पासाठी देऊन त्यातून फायदाही मिळू शकतो.