जिल्हा परिषद भरती परीक्षेला शनिवारपासून मुहुर्त; पहिला टप्पा : ११ ऑक्टोबरपर्यंत आठ संवर्गासाठी परीक्षा 

By नितीन काळेल | Published: October 4, 2023 07:43 PM2023-10-04T19:43:00+5:302023-10-04T19:43:09+5:30

परीक्षेसाठी उमेदवारांना सातारा जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावरील लिंकवरुन प्रवेशपत्र डाऊनलोड करुन घ्यायचे आहे.

satara Zilla Parishad recruitment exam scheduled from Saturday; Phase I: Examination for eight cadres till October 11 | जिल्हा परिषद भरती परीक्षेला शनिवारपासून मुहुर्त; पहिला टप्पा : ११ ऑक्टोबरपर्यंत आठ संवर्गासाठी परीक्षा 

जिल्हा परिषद भरती परीक्षेला शनिवारपासून मुहुर्त; पहिला टप्पा : ११ ऑक्टोबरपर्यंत आठ संवर्गासाठी परीक्षा 

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : सातारा जिल्हा परिषद भरती प्रक्रियेतील परीक्षेस मुहुर्त लागला असून शनिवार, दि. ७ आॅक्टोबरपासून याची सुरूवात होणार आहे. या पहिल्या टप्प्यात आठ संवर्गासाठी परीक्षा होत असून ती ११ आॅक्टोबरपर्यंत चालणार आहे.

सातारा जिल्हा परिषदेतील २१ संवर्गातील ९७२ पदाच्या भरतीबाबत पात्र उमदेवारांकडून ५ ते २५ आॅगस्टदरम्यान आॅनलाइन पध्दतीने अर्ज मागणी करण्यात आली होती. जिल्ह्यातील भरतीसाठी ७४ हजार ५७८ उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. या भरती प्रक्रियेची परीक्षा शनिवार दि. ७ आॅक्टोबरपासून सुरू होत आहे. पहिल्या टप्प्यात आठ संवर्गासाठी परीक्षा होत आहे. यामध्ये शनिवार दि. ७ रोजी रिंगमन (दोरखंडवाला) आणि वरिष्ठ सहायक (लेखा) परीक्षा होणार आहे. तर ८ आॅक्टोबरला विस्तार अधिकारी (सांख्यिकी) आणि दि. १० रोजी विस्तार अधिकारी (कृषी) तसेच आरोग्य पर्यवेक्षकची परीक्षा होईल. त्याचबरोबर ११ आॅक्टोबर लघुलेखकची निम्न आणि उच्चश्रेणी तसेच कनिष्ठ सहायक लेखाची परीक्षा होणार आहे.

या परीक्षेसाठी उमेदवारांना सातारा जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावरील लिंकवरुन प्रवेशपत्र डाऊनलोड करुन घ्यायचे आहे. तसेच जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर परीक्षेसंदर्भात एक डेमोलिंकही उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे.

जिल्हा परिषदेचे आवाहन...
सातारा जिल्हा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसारित सूचनांव्यतिरिक्त अन्य अफवांवर विश्वास ठेवू नये. या भरीतच्या अनुषंगाने संकेतस्थळावर वेळोवळी सूचना प्रसारित केल्या जाणार आहेत. त्यामुळे उमेदवारांनी सातारा जिल्हा परिषद संकेतस्थळावरुन माहिती घ्यावी. तसेच उमेदवारांनी समाजविघातकांच्या प्रलोभनाला बळी पडू नये, असे आवाहनही जिल्हा परिषदेच्या वतीने करण्यात आले आहे.

Web Title: satara Zilla Parishad recruitment exam scheduled from Saturday; Phase I: Examination for eight cadres till October 11

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.