Satara ZP Election: अध्यक्षांची संधी हुकली, उपाध्यक्षांची तयारी!
By नितीन काळेल | Published: July 29, 2022 01:03 PM2022-07-29T13:03:46+5:302022-07-29T13:05:57+5:30
सातारा जिल्हा परिषदेवर मागील २० वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेसची निर्विवाद सत्ता
नितीन काळेल
सातारा : सातारा जिल्हा परिषदेच्या ७३ गटांसाठी आरक्षण जाहीर झाले असून, अध्यक्ष राहिलेले उदय कबुले यांच्या गटात महिला आरक्षण पडले असल्याने त्यांची संधी हुकली आहे, तर उपाध्यक्ष राहिलेल्या प्रदीप विधाते खुल्या गटातून पुन्हा उतरू शकतात. यामध्ये शिक्षण सभापती राहिलेल्या मानसिंगराव जगदाळेंना लॉटरी लागली आहे, तर इतर सभापतींना संधी धूसर दिसत आहे.
सातारा जिल्हा परिषदेवर मागील २० वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेसची निर्विवाद सत्ता आहे. मागील निवडणूक २०१७ च्या जानेवारी महिन्यात झाली होती. त्या वेळी संजीवराजे नाईक-निंबाळकर हे अध्यक्ष तर वसंतराव मानकुमरे उपाध्यक्ष झालेले. त्यानंतर शेवटच्या अडीच वर्षांसाठी उदय कबुले अध्यक्ष आणि प्रदीप विधाते यांना उपाध्यक्षपद मिळाले. या पदाधिकाऱ्यांचा आणि सदस्यांचा पाच वर्षांचा कार्यकाल २० मार्चला संपला. त्यानंतर प्रशासकीय राजवट सुरू झाली. गुरुवारी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी आरक्षण सोडत झाली. यामध्ये अनेकांचा हिरमोड झाला आहे.
अध्यक्ष राहिलेले उदय कबुले हे पुन्हा इच्छुक होते. पण, त्यांचा शिरवळ गट हा सर्वसाधारण महिलेसाठी राखीव झाला आहे. त्यामुळे त्यांना निवडणुकीत उतरता येत नसलेतरी कुटुंबातील कोणी महिला उमेदवार असू शकतात. याच खंडाळा तालुक्यातील कृषी समितीचे माजी सभापती मनोज पवार यांचा खेड बुद्रुक गटही ओबीसीसाठी राखीव आहे. त्यामुळे त्यांचीही संधी हुकली आहे. तर उपाध्यक्ष राहिलेले प्रदीप विधाते यांच्या खटाव गटात सर्वसाधारण आरक्षण पडले आहे. त्यामुळे विधाते हे पुन्हा दावेदार आहेत. राष्ट्रवादीपुढे त्यांच्याशिवाय दुसरा चेहरा असणार नाही. यामध्ये खरी लॉटरी लागली आहे, ती शिक्षण समिती सभापती राहिलेल्या मानसिंगराव जगदाळे यांना. त्यांचा मसूर गट पुन्हा खुल्या प्रवर्गासाठी राखीव झाला आहे. त्यामुळे त्यांची उमेदवारी पुन्हा असणार आहेच.
कृषी समिती सभापती मंगेश धुमाळ हे कोरेगाव तालुक्यातील पिंपोड बुद्रुक गटातून निवडून आले होते. त्यांचा गट आता नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी राखीव आहे. त्यामुळे त्यांना तेथून तसेच लगतच्या गटातूनही संधी नाही. ओबीसी प्रवर्गातून निवडून आलेल्या समाजकल्याण समिती सभापती कल्पना खाडे यांचा निमसोड गट आता सर्वसाधारणसाठी आहे. खाडे यांना उभे राहण्याची संधी असलीतरी राष्ट्रवादीकडून अन्य कोणाला रिंगणात उतरवले जाईल. माण तालुक्यातील मार्डी गटातून महिला व बालविकास समिती सभापती सोनाली पोळ निवडून आल्या होत्या. आता या गटाचे आरक्षण सर्वसाधारणसाठी आहे. त्यांचे पती या निवडणुकीत उतरू शकतात.
संजीवराजे पुन्हा...
फलटण तालुक्यात एकूण ९ गट आहेत. या तालुक्यात ओबीसी तसेच अनुसूचित जातीसाठी एकही गट राखीव नाही. सर्वसाधारणसाठी ७ आणि सर्वसाधारण महिलेसाठी २ गट आहेत. या तालुक्यातून पुन्हा संजीवराजे नाईक-निंबाळकर जिल्हा परिषदेत येऊ शकतात.
दत्ता अनपट यांचा सत्कार...
जिल्हाधिकारी कार्यालयात आरक्षण जाहीर झाले. यामध्ये फलटण तालुक्यातील हिंगणगाव गट सर्वसाधारणसाठी जाहीर झाला. त्यानंतर गटातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी दत्ता अनपट यांचा नियोजन भवनाबाहेर सत्कारच केला. कारण, अनपट हे सध्या या गटाचे नेतृत्व करत होते.