सातारा जिल्हा परिषदेला पाहिजे सेवानिवृत्तांचा एक तास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2019 12:33 AM2019-05-07T00:33:08+5:302019-05-07T00:35:11+5:30
सातारा : खासगी शाळांबरोबर शैक्षणिक स्पर्धेत उतरण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासन सज्ज झाले आहे. जिल्ह्यातील सेवानिवृत्तांनी या उपक्रमासाठी जिल्हा परिषद ...
सातारा : खासगी शाळांबरोबर शैक्षणिक स्पर्धेत उतरण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासन सज्ज झाले आहे. जिल्ह्यातील सेवानिवृत्तांनी या उपक्रमासाठी जिल्हा परिषद शाळांना एक तास द्यावा, अशी अभिनव कल्पना मांडण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी तरुणी आणि महिलांनीही हातभार लावण्याची संकल्पना जिल्हा परिषदेने मांडली आहे.
सातारा जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर शिक्षण घेतात. शासनाच्या ध्येय धोरणानुसार जिल्ह्यातील शाळांची वाटचाल सुरू आहे. मात्र, बदलत्या काळातील मूल्यशिक्षणासाह जीवनावश्यक कौशल्य शिकविण्याबरोबरच त्यांना वर्तनशास्त्र शिकविणंही आवश्यक बनलं आहे. जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक आपापल्या परीने हे शिक्षण विद्यार्थ्यांना देत आहेत; पण नियमित अभ्यासक्रम आणि अन्य कामांमुळे त्यांच्यावर अन्य शिक्षणाचा ताण देणं प्रशासनाला कठीण जात आहे.
या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी अभिनव उपक्रम राबविण्याचं ठरविलं आहे. पेन्शनर्स सिटी म्हणून साताऱ्याची ओळख आहे. त्यामुळे येथे विविध विभागातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी आपापल्या परिसरातील शाळांना आठवड्यातून, पंधरवड्यातून किंवा महिन्यातून एक तास वेळ देणं अपेक्षित आहे. या वेळेत त्यांनी जीवन जगण्याचं मूल्य आणि कौशल्य शिकविणं अपेक्षित आहे. सेवानिवृत्तांबरोबरच महिला मंडळे, बिशी गट यांच्यासह जिल्ह्यातील तरुणींनी यासाठी हातभार लावणं आवश्यक आहे. इच्छुकांनी यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे अर्ज करणे अपेक्षित आहे.
सहभागीसाठी हे करा!
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी सहभागी होऊ इच्छिणाºया सेवानिवृत्त कर्मचारी, तरुणी आणि महिलांनी जिल्हा परिषदेकडे अर्ज करणे अपेक्षित आहे. या अर्जामध्ये त्यांनी आपली रहिवास पत्त्यासह थोडक्यात माहिती देणं अपेक्षित आहे. याबरो
बरच जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना कोणता विषय शिकवणार, यासाठी किती वेळ देऊ शकणार, याविषयी माहिती द्यावी. आपण राहत असलेल्या परिसरातील शाळेची निवड करून त्या शाळेत कला कौशल्यापासून जीवनावश्यक मूल्य रुजवणारे शिक्षण देणं महत्त्वाचं आहे.
विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्यासाठी आम्ही हा उपक्रम राबवत आहे. ३० मेपर्यंत इच्छुकांचे अर्ज प्राप्त होणे अपेक्षित आहे. त्यानंतर शिक्षण विभागाशी चर्चा करून शाळेच्या तासिकेत हे वर्ग समाविष्ट करण्यात येतील. सामाजिक कार्याची आवड असलेल्यांनी यासाठी पुढे यावे.
- डॉ. कैलास शिंदे,
मुख्य कार्यकारी अधिकारी, सातारा