सातारकरांनी पुन्हा घडविले सामाजिक सलोख्याचे दर्शन, न्यायालयीन निर्णयाचा आदर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2019 01:26 PM2019-11-09T13:26:35+5:302019-11-09T13:29:08+5:30
बहुचर्चित अयोध्या रामजन्मभूमीचा निकाल शनिवारी सकाळी जाहीर झाला. सातारकरांनी नेहमीप्रमाणेच सामाजिक सलोख्याचे दर्शन घडवत न्यायालयीन निर्णयाचा आदर केला. जिल्ह्यातील सर्वच व्यवहार शनिवारी दुपारपर्यंत नेहमीप्रमाणेच सुरळीत होते.
सातारा : बहुचर्चित अयोध्या रामजन्मभूमीचा निकाल शनिवारी सकाळी जाहीर झाला. सातारकरांनी नेहमीप्रमाणेच सामाजिक सलोख्याचे दर्शन घडवत न्यायालयीन निर्णयाचा आदर केला. जिल्ह्यातील सर्वच व्यवहार शनिवारी दुपारपर्यंत नेहमीप्रमाणेच सुरळीत होते.
दरम्यान, अनुचित प्रकार घडू नयेत, यासाठी शहरात पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे.
अध्योध्यातील राम जन्मभूमी आणि बाबरी मशिद जमिनीबाबत शनिवारी सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येणे अपेक्षित होते. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन काही दिवसांपासूनच सज्ज झाले होते. तालुका, गावपातळीवर शांतता कमिटीची बैठक घेऊन सर्वांना शांतता राखण्याचे आवाहन केले जात होते.
खासदार श्रीनिवास पाटील, खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनीही शनिवारी सकाळी साडेनऊ वाजता येथील पोलीस करमणूक केंद्रात शांतता कमिटीची बैठक घेतली. यावेळी जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, प्रांताधिकारी मिनाज मुल्ला, तहसीलदार आशा होळकर, सहायक पोलीस अधीक्षक समीर शेख आदी उपस्थित होते. या बैठकीतही मान्यवरांनी शांतता राखण्याचे आवाहन केले.