शिक्षिकांच्या गर्भधारणेविषयी बडबडणाऱ्या अधिकाऱ्याविरोधात साताऱ्यात संताप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2018 04:03 PM2018-07-11T16:03:30+5:302018-07-11T16:05:56+5:30
शिक्षकांची कोणकोणती कामे आम्ही अधिकाऱ्यांनी करावीत? शिक्षिकांच्या गर्भधारणाही आम्हीच तपासावी काय? अशी बेताल वक्तव्ये करणाऱ्या सातारा जिल्हा परिषदे’च्या उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या विरोधात शिक्षिका संतप्त झाल्या. शाळेला हक्काची रजा टाकून या शिक्षिकांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेतली. त्यावेळी जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनीही संबंधित अधिकारी सत्यजित बडे यांना तत्काळ सूचना देऊ, असे आश्वासन दिले.
सातारा : शिक्षकांची कोणकोणती कामे आम्ही अधिकाऱ्यांनी करावीत? शिक्षिकांच्या गर्भधारणाही आम्हीच तपासावी काय? अशी बेताल वक्तव्ये करणाऱ्या सातारा जिल्हा परिषदे’च्या उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या विरोधात शिक्षिका संतप्त झाल्या. शाळेला हक्काची रजा टाकून या शिक्षिकांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेतली. त्यावेळी जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनीही संबंधित अधिकारी सत्यजित बडे यांना तत्काळ सूचना देऊ, असे आश्वासन दिले.
दोन दिवसांपूर्वी बदलीसंदर्भात जिल्ह्यातील काही शिक्षक सत्यजित बडे यांना भेटले होते. त्यावेळी शिक्षिकांच्या बाबत सहानुभूतीपूर्वक विचार करण्याचे सांगताच ते म्हणाले, शिक्षिकांच्या बदल्या, त्यांचे दुर्गम भागात जाणे, विस्थापित होणे याबरोबरच त्यांची गर्भधारणाही आम्हीच तपासू का?
बडे यांच्या या विधानावर उपस्थित शिक्षक अवाक् झाले. शिक्षकांनी आता शिक्षकांची नोकरी सोडून पत्रक लिहिणं, पत्रकारांना बातम्या पुरवणं अन् नेतेगिरी करण्याचा सल्लाही त्यांनी दिला. या पार्श्वभूमीवर संतप्त झालेल्या शिक्षिकांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालय गाठले.
जिल्हाधिकारी सिंघल यांच्याशी बोलातना शिक्षिका म्हणाल्या, शिक्षकांवर पातळी सोडून बोलणारे बडे यांचा जिल्ह्याच्या वतीने निषेध करतो. महिलांच्या सुरक्षिततेचा विचार न करता त्यांची अन्यायग्रस्त बदलीबाबत कसलीच जबाबदारी न घेणाऱ्या या अधिकाऱ्याने शिक्षक आणि शिक्षिका यांच्याबाबत केलेले विधान लज्जास्पद आहे. बदली प्रक्रियेमुळे आमचे आयुष्य हादरून गेले असताना अत्यंत असंवेदनशीलपणे वक्तव्य करणं त्या पदाला शोभनीय नाही.