मराठी साहित्य संमेलनांवर सातारी सारस्वतांचा प्रभाव!
By admin | Published: September 11, 2015 09:13 PM2015-09-11T21:13:54+5:302015-09-12T00:10:29+5:30
इतिहासाला उजाळा : ११ सातारकरांनी पटकावले अध्यक्षपद
सातारा : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावर याआधी ११ सातारकर सारस्वतांनी आपली मोहोर उमटवली आहे. गतवर्षी अरुण गोडबोले यांनी या पदासाठी लढत दिली होती, आताही अध्यक्षपदाच्या रिंगणात कवी श्रीनिवास वारुंजीकर हे सातारकर लढणार आहेत. १९०५ मध्ये झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष रघुनाथ पांडुरंग करंदीकर (सातारा) हे होते. नरसिंह चिंतामन केळकर हे बडोदे येथे १९२१ मध्ये झालेल्या संमेलनाचे अध्यक्ष होते. औंधचे राजे भगवानराव श्रीनिवासराव पंतप्रतिनिधी हे इंदोर येथे १९३५ झालेल्या संमेलनाच्या अध्यक्षपदावर विराजमान झाले होते. चाफळचे यशवंत दिनकर पेंढारकर हे १९५० मध्ये मुंबई संमेलनाचे अध्यक्ष होते. पालीचे श्रीकृष्ण केशव क्षीरसागर यांनी १९५९ च्या मिरज संमेलनाचे अध्यक्षपद भुषविले.पूर्वी सातारा जिल्ह्यात असणाऱ्या माडगुळे गावचे गजानन दिगंबर माडगूळकर (गदिमा) १९७३ मध्ये यवतमाळ संमेलनाचे अध्यक्ष होते. माडगुळे गावचेच दुसरे सुपुत्र व्यंकटेश दिगंबर माडगूळकर हे १९८३ मध्ये अंबेजोगाई संमेलनाचे अध्यक्ष होते.आटपाडीचे शंकरराव रामचंद्र खरात हे १९८४ मध्ये झालेल्या जळगाव संमेलनाचे अध्यक्ष होते. रहिमतपूरचे वसंत शंकर कानेटकर यांनी १९८८ मध्ये ठाणे संमेलनाचे अध्यक्षपद भूषविले. सातारा शहरातील ना. सं. इनामदार यांनी १९९७ च्या नगर संमेलनाचे तर कऱ्हाडचे कवी वसंत वामन बापट यांनी १९९९ च्या मुंबई संमेलनाचे अध्यक्षपद भूषविले होते. दरम्यान, गतवर्षी सातारचे साहित्यिक अरुण गोडबोले यांनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढविली होती; पण त्यात त्यांना यश आले नव्हते. यावर्षीही सातारचे श्रीनिवास वारुंजीकर यांनी अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल केला आहे. (प्रतिनिधी)
वारुंजीकरांचा फेसबुकद्वारे प्रचार
अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील प्रचाराची मोहीम श्रीनिवास वारुंजीकर यांनी सुरू केली आहे. त्यासाठी त्यांनी सोशल मीडियाचाही आधार घेतला असल्याचे त्यांनी सांगितले. त्यासाठी प्रथम फेसबुकवर पेजही तयार करण्यात आले असून, त्यावर वारुंजीकर यांनी आपली उमेदवारीमागील प्राथमिक भूमिकाही मांडली आहे.