साताऱ्याची लावण्यतारका सातासमुद्रापार!
By admin | Published: July 25, 2016 12:32 AM2016-07-25T00:32:40+5:302016-07-25T00:32:40+5:30
पूनम कुडाळकर : इजिप्त, इराक अन् इराणमध्ये दिवाळीत होणार नृत्याचा कार्यक्रम
जगदीश कोष्टी / सातारा
नऊवारी साडी, केसांचा अंबाडा घातलेली लावणीसम्राज्ञी व्यासपीठावर आल्यावर रसिकांच्या काळजाचा ठोका चुकलाच म्हणून समजा; पण कुडाळ येथील पूनम कुडाळकर हिच्या अदाकरीने पुरुषांबरोबरच महिलांची मने जिंकली आहे. साताऱ्याच्या ‘लावण्यतारका’चा गवगवा सातासमुद्रापार पोहोचला आहे. दिवाळीमध्ये इराक, इराण अन् इजिप्तमध्ये कार्यक्रम होणार आहेत.
जावळी तालुक्यातील पूनम जावळे ही महाराष्ट्रातील लावणी रसिकांसाठी पूनम कुडाळकर या नावाने परिचित आहे. पूनम सातवीत असताना आॅक्रेस्ट्रॉच्या माध्यमातून व्यासपीठावर पदार्पण केले. त्यानंतर काही वर्षांतच तिने या क्षेत्रात चांगले नाव कमविले.
पूनमची आई विठाबाई जावळे या चांगल्या नृत्यंगणा आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून तिला नृत्याचे धडे मिळाले. तर मावशी मंगल जावळे या प्रसिद्ध तमाशा कलावंतीण आहे. त्या चांगल्या पद्धतीने गाणेही गातात. त्यामुळे गाणे अन् नृत्याचे गुरू घरातून लाभले.
मावशीचा कोल्हापुरात आॅक्रेस्ट्रा होता. यामधून पूनमने नृत्य करण्यास सुरुवात केली. चार वर्षे कोल्हापूर गाजवल्यानंतर तिने पुण्यामध्ये नृत्याचे प्रशिक्षण घेतले.
विदर्भ, मराठवाडा, खाण्देशबरोबरच संपूर्ण राज्यभर तिचे सुमारे दोन हजार प्रयोग झाले आहेत. आंध्रप्रदेशच्या सीमेवर मराठी माणसांसाठी केलेला कार्यक्रम विशेष गाजला. निपाणीमध्ये महिलांसाठी विशेष कार्यक्रम आयोजित केला होता. केवळ महिलांसाठी कार्यक्रम असेल तर ‘लावण्यतारका’ तर सर्वांसाठी खुला असल्यास ‘तुमच्यासाठी कायपण’ या नावाने ती प्रयोग करते. तिने आत्तापर्यंत दोन चित्रपटांमध्ये कला सादर केली आहे. ‘भावाची लक्ष्मी, व्वा पैलवान’ या सिनेमात तिने काम केले आहे. तर पंधरा लावण्यांचा सीडी अल्बम बाजारात आला आहे.
अविस्मरणीय ‘शांताबाई...’
‘शांताबाई’ या गाण्याने सर्वांनाच वेड लावले आहे. पण, या गाण्याशी पूनम कुडाळकरचा जवळचा संबंध आला आहे. हे गाणे नुकतेच बाजारात आले तेव्हा दहीहंडीच्या कार्यक्रमात पूनमला या गाण्यावर नाचविण्याचा निर्णय नृत्यदिग्दर्शक योगेश देशमुख यांनी घेतला. संबंधित संगीत कंपनीची परवानगी घेऊन वेगळा पेहराव व गॉगल घालून नृत्य केले. पुढे या कंपनीने हीच थीम वापरून व्हिडीओ बाजारात आणला.