साताऱ्यातील पारा ४२ अंशांवर!
By admin | Published: April 17, 2017 11:13 PM2017-04-17T23:13:35+5:302017-04-17T23:13:35+5:30
असह्य उकाडा : कडक उन्हामुळे उष्माघाताच्या प्रमाणात वाढ
सातारा : सूर्यनारायणाचे आग ओकण्याचे प्रमाण काही केल्या कमी होत नाही. सोमवारी तर कहर झाला असून, तापमानाने ४२ अंश सेल्सिअसची पातळी गाठली आहे. काही कामानिमित्ताने घराबाहेर पडलेल्यांना उष्माघाताचा त्रास सहन करावा लागत आहे.
‘थंडा-थंडा, कूल-कूल’ म्हणून ओळख असलेल्या सातारा जिल्ह्याचीही ‘हॉट’ सिटीत गणना होते की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. मार्च महिन्यापासूनच उष्णतेचे प्रमाण वाढले आहे. गेल्या आठवड्यापासून चाळीस अंश सेल्सिअसच्या घरात तापमान होते. त्यामुळे जिल्हा चांगलाच तापला आहे.
तापमानाच्या पाऱ्याने सोमवारी उच्चांकी पातळी गाठली. तापमापीवर सरासरी ४२ अंश सेल्सिअसची नोंद झाली आहे. असह्य उकाड्यामुळे अंगाची लाहीलाही होत आहे. त्यामुळे दुपारच्या वेळेत शहरातील सर्वच मुख्य रस्ते ओस पडत आहेत. महाविद्यालयीन तरुणी, नोकरदार महिला कामानिमित्त बाहेर जात असताना डोक्याला स्कार्प, स्टोल, सनकोट घालूनच बाहेर पडत आहेत. तसेच पुरुष मंडळीही डोक्यावर टोपी, तोंडाला रुमाल बांधूनच जावे लागत आहेत. (प्रतिनिधी)