साता-याचा पारा दोन अंशाने वाढला ! मार्च महिन्यात गतवर्षीपेक्षा वाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2018 01:32 PM2018-03-11T13:32:58+5:302018-03-11T13:32:58+5:30
होळीपासून तापमानात वाढ झाली असून, सध्या साता-यातील किमान तापमान १९ तर कमाल ३७ अंशाच्यावर असल्याने उन्हाचा चटका जाणवत आहे.
सातारा : होळीपासून तापमानात वाढ झाली असून, सध्या साता-यातील किमान तापमान १९ तर कमाल ३७ अंशाच्यावर असल्याने उन्हाचा चटका जाणवत आहे. तर गतवर्षी मार्च महिन्याच्या सुरुवातील कमाल तापमान ३५ अंशापर्यंत होते. त्यात दोन अंशांनी वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
गेल्या तीन महिन्यांपासून सातारा जिल्ह्यात थंडी जाणवत होती. डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या टप्प्यात दोन वर्षांतील किमान तापमानाने निच्चांकी पातळी गाठली होती. त्यावेळी किमान तापमान ९ अंशापर्यंत खाली आले होते. तर गेली तीन महिने सरासरी किमान तापमान हे ११ ते १४ अंशाच्या दरम्यान स्थिर होते. त्यामुळे थंडी कायम जाणवत होती. जानेवारी महिन्याच्या मध्यावर तर संक्रांतीच्यावेळी किमान तापमान वाढून ते १८ अंशापर्यंत पोहोचले होते. त्यानंतर किमान तापमानात हळूहळू घट होत गेली व पुन्हा थंडी जाणवू लागली. सध्या मात्र, थंडी गुल झाल्याचे दिसत आहे. होळीनंतर किमान आणि कमाल तापमानात मोठा फरक पडला आहे. तापमानात वाढ झाल्याने थंडी पळाली असून, दुपारी व रात्रीच्या सुमारास उकाडा जाणवत आहे.
वाढत्या उन्हामुळे दुपारच्या सुमारास लोक घरी थांबणे पंसद करत आहेत. तसेच काहीजण झाडाच्या सावलीला विसावा घेत आहेत. नागरिकांनी पंखा, कूलरचा वापर करण्यास सुरुवात केली आहे. बाजारपेठेतही पंखे खरेदीसाठी मागणी वाढली आहे.
तापमान किमान कमाल
दि. ३ मार्च १६.०४ ३६.०१
दि. ४ मार्च १७.०९ ३६.००
दि. ५ मार्च १८.०६ ३५.००
दि. ६ मार्च १८.०८ ३५.०४
दि. ७ मार्च १८.०५ ३५.०९
दि. ८ मार्च १७.०३ ३५.०५
दि. ९ मार्च १७.०६ ३६.००
दि. १० मार्च १९.०४ ३७.०२
दि. ११ मार्च १९.०४ ........