साताऱ्याचा पारा ४० अंशाच्या उंबरठ्यावर...जिल्हा तापला: ३९.३ अंशाची नोंद
By नितीन काळेल | Published: April 12, 2023 08:20 PM2023-04-12T20:20:08+5:302023-04-12T20:20:33+5:30
तीन दिवसांत चार अंशाने वाढ
सातारा : जिल्ह्यात उन्हाची तीव्रता वाढत असून बुधवारी तर सातारा शहराचे कमाल तापमान ३९.३ अंश नोंद झाले. त्यामुळे यावर्षातील हे उच्चांकी तापमान ठरले. त्याचबरोबर शहराच्या तापमानात तीन दिवसांत चार अंशाहून अधिक वाढ झाल्याने नागरिक उकाड्याने हैराण झाले आहेत.
जिल्ह्यात यावर्षी थंडीचे प्रमाण कमी होते. त्यातच दरवर्षी मार्च महिन्यापर्यंत राहणारी थंडी फेब्रुवारीतच गायब झाली.
त्यावेळीच जिल्ह्याचा पारा वाढत गेला. तर फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सातारा शहराचे कमाल तापमान ३७ अंशापर्यंत पोहोचले होते. यामुळे यंदाचा उन्हाळा असह्य करणार अशी भीती वाटत होती. मात्र, मार्च महिन्याच्या मध्शावर अवकाळी पावसाने दणका दिला. त्यामुळे तापमानात उतार आला. त्यावेळी सातारा शहराचा पारा तर २९ अंशापर्यंत खाली आला होता.
त्यानंतर तापमान वाढत गेले. पण, मार्च महिना संपेपर्यंत तापमान ३५ अंशापुढे गेले नव्हते. मात्र, एप्रिल महिना सुरू झाल्यानंतर तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झाली. त्यातच मागील आठवड्यात जिल्ह्यात वळवाचा पाऊस झाला. तसेच ढगाळ वातावरण तयार झालेले. पण, तापमान ३० अंशाखाली गेलेच नाही. उलट गेल्या चार दिवसांत पारा वाढत गेला आहे.
सातारा शहराचा पारा रविवारी ३४.८ अंश नोंद झाला होता. तर बुधवारी ३९.३ अंशाची नोंद झाली. अवघ्या तीन दिवसांत पारा चारहून अधिक अंशानी वाढला. यामुळे दुपारच्या सुमारास कडाक्याच्या उन्हाशी सातारकांना सामना करावा लागत आहे. तर रात्रीच्या सुमारास उकाडा हैराण करुन सोडत आहे.
आगामी काळात तर पारा आणखी वाढणार आहे. यामुळे सातारकरांना कडाक्याचे ऊन आणि तीव्र उकाड्याशी सामना करावा लागणार आहे.
दरम्यान, महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण. येथील पाराही वाढत चालला आहे. बुधवारी महाबळेश्वरला ३१.६ अंशाची नोंद झाली. त्यामुळे जागतिक पर्यटनस्थळही तापू लागल्याचे दिसून येत आहे. तर जिल्ह्याच्या पूर्व भागात कडक ऊन पडत आहे. त्यामुळे माण, खटाव, फलटण तालुक्यात शेती कामावर परिणाम झालेला आहे.
सातारा शहरात नोंद कमाल तापमान...
दि. १ एप्रिल ३४.०७, २ एप्रिल ३४.०८, ३ एप्रिल ३५.०७, ४ एप्रिल ३७.०५, ५ एप्रिल ३६.०२, ६ एप्रिल ३७.०५, दि. ७ एप्रिल ३५.०४, ८ एप्रिल ३२.०२, ९ एप्रिल ३४.०८, १० एप्रिल ३७, ११ एप्रिल ३८.०१ आणि दि. १२ एप्रिल ३९.०३