साताराच्या दोघांना लाच घेताना अटक

By Admin | Published: August 29, 2016 11:08 PM2016-08-29T23:08:11+5:302016-08-29T23:13:00+5:30

सांगलीत ‘लाचलुचपत’ची कारवाई

Satara's two arrested for taking a bribe | साताराच्या दोघांना लाच घेताना अटक

साताराच्या दोघांना लाच घेताना अटक

googlenewsNext

सांगली : पेन्शन मंजुरीसाठी वेतननिश्चितीचा अहवाल देण्याकरिता सेवानिवृत्त मुख्याध्यापकाकडून दहा हजारांची लाच घेताना लेखाधिकाऱ्यासह दोघांना रंगेहात पकडण्यात आले. लेखाधिकारी समाधान भगवान चव्हाण (वय ३७, रा. मथुरा नंदन बिल्डिंग, महालक्ष्मी कॉलनी, सातारा) व कनिष्ठ लेखापरीक्षक शंकर शरणाप्पा मडकई (५०, सदर बझार, गुलमोहर कॉलनी प्लॉट क्रमांक ३१, सातारा) अशी त्यांची नावे आहेत. सांगली-मिरज रस्त्यावरील मध्यवर्ती प्रशासकीय कार्यालयात सोमवारी दुपारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली.
तक्रारदार मुख्याध्यापक काही महिन्यांपूर्वी सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांनी त्यांच्या पेन्शन मंजुरीसाठी मुंबईतील लेखापरीक्षक शिक्षण विभागात अर्ज केला होता. या विभागाने त्यांना पेन्शन मंजूर करण्यासाठी, वेतन किती होते, हे निश्चित करून तसा अहवाल सादर करण्याचा आदेश सांगलीतील लेखापरीक्षण विभागाला दिला होता. हा अहवाल देण्याचे काम चव्हाण व मडकई यांच्याकडे होते. तक्रारदाराने त्यांची भेट घेतली, त्यावेळी संशयितांनी हा अहवाल देण्यासाठी त्यांच्याकडे दहा हजार रुपये मागितले.
लाचेची रक्कम दिली तरच अहवाल देऊ, असे त्यांनी सांगितले. तक्रारदाराने, दहा हजार रुपये जास्त होतात, असे सांगताच संशयितांनी, सात हजार रुपये तरी द्यावे लागतील, असे बजावले.
त्यावर तक्रारदाराने सांगलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार दाखल केली. या विभागाने तक्रारीची चौकशी केली असता, संशयितांनी लाच मागितल्याचे निष्पन्न झाले होते.
तक्रारदाराने सोमवारी दुपारी लाचेची रक्कम घेऊन येतो, असे सांगितले. तत्पूर्वी मध्यवर्ती प्रशासकीय कार्यालयातील लेखापरीक्षक शिक्षण विभागात सापळा लावण्यात आला.
तेथे दुपारी सव्वादोन वाजता सात हजाराची लाच घेताना चव्हाण व मडकई यांना रंगेहात पकडण्यात आले व त्यांच्याविरुद्ध विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांना मंगळवारी न्यायालयात उभे केले जाणार आहे.
रात्री उशिरापर्यंत कारवाई सुरू होती. मध्यवर्ती प्रशासकीय कार्यालयात अनेक शासकीय कार्यालयांचे स्थलांतर झाले आहे. ‘लाचलुचपत प्रतिबंधक’ची या इमारतीतील ही पहिलीच कारवाई आहे.
(प्रतिनिधी)


साताऱ्यात घरांवर छापे
‘लाचलुचपत प्रतिबंधक’चे पोलिस उपअधीक्षक परशराम पाटील यांनी या कारवाईची माहिती सातारा विभागाला दिली. तेथील पथकाने सायंकाळी चव्हाण व मडकई यांच्या घरांवर छापे टाकून झडती घेतली. तासभर ही झडती सुरू होती. त्याचा अहवाल रात्री उशिरा सांगली विभागाला मिळाला आहे.

Web Title: Satara's two arrested for taking a bribe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.