लॉकडाऊन काळात कास पठारावर फुलला सातारीतुरा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 04:39 AM2021-05-10T04:39:42+5:302021-05-10T04:39:42+5:30

पेट्री : जागतिक वारसा हक्काच्या यादीत समावेश असलेल्या कासच्या शिरपेचात सातारीतुरा उमलला आहे. सातारान्सिस हे फूल मे महिन्याच्या दरम्यान ...

Sataritura blossomed on Cas Plateau during lockdown! | लॉकडाऊन काळात कास पठारावर फुलला सातारीतुरा !

लॉकडाऊन काळात कास पठारावर फुलला सातारीतुरा !

Next

पेट्री : जागतिक वारसा हक्काच्या यादीत समावेश असलेल्या कासच्या शिरपेचात सातारीतुरा उमलला आहे. सातारान्सिस हे फूल मे महिन्याच्या दरम्यान पहिल्या पावसात दर्शन देऊ लागले आहे. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र संचारबंदी असून, फुललेला सातारीतुरा जागतिक वारसास्थळ कास पठारावरच लॉकडाऊन झाला आहे. ‘सातारीतुरा’ या फुलाला शास्त्रीय भाषेत अपोनोजेटॉन सातारान्सिस म्हणूनही ओळखले जाते. दुर्मीळ वनस्पतीपैकी मुळाशी कंद असणारे हे भुई ऑर्किड आहे. पहिला पाऊस झाल्यानंतर सह्याद्रीच्या काही भागात, खडकात, मातीचा भाग व त्यामध्ये पाणी साचते, अशा ठिकाणी ही वनस्पती आढळते. जमिनीत छोटा कंद असतो. त्यावर येणारे पान हे लांब व जाडसर आकाराचे असते. भाल्यासारखे दिसते.

पानामध्ये अन्नसाठा भरपूर प्रमाणात साठवत असते. दोन ते तीन पानांच्या बेचक्यातून लांब व जाडसर अशा दांड्यात इंग्रजी वाय आकाराचा तुरा येतो. म्हणून यास वायतुरा म्हणतात. हे फूल केवळ साताऱ्याच्या पश्चिम भागात चार ते पाच ठिकाणीच सड्यावर आढळते. म्हणून यास सातारीतुरा म्हणतात. सातारीतुरा वनस्पती कास पठार व परिसरातील जैवविविधतेचे भूषण ओळखले जाते.

चौकट :

कास पठाराचे वैशिष्ट्य !

जून ते ऑक्टोबर महिन्यांदरम्यान तृण, कंद, वेली तसेच वृक्ष, झुडपे, आर्किड व डबक्यातील वनस्पतींना अत्यंत आकर्षक निळ्या, जांभळ्या, लाल, रंगांची फुले येतात. मध्य ऑगस्ट ते सप्टेंबर महिन्यांत विविधरंगी दुर्मीळ फुलांचे गालीचे आकर्षित करतात. गतवर्षीपासून कोरोना महामारीच्या संकटाचे सावट कायमच आहे. यामुळे सर्वत्र संचारबंदी असल्याने लॉकडाऊन काळात सातारीतुरा फुलल्याचे चित्र आहे.

(कोट)

सातारीतुरा म्हणजेच वायतुरा आहे. सह्याद्रीच्या पठारावर येणारी ही पहिली प्रजाती असून, ती अतिशय सुंदर व विलोभनीय आहे. अशा प्रकारच्या अनेक दुर्मीळ प्रजातीचे रक्षण करून पर्यावरणाचे संरक्षण होणे आपणा सर्वांचे कर्तव्य आहे.

-अभिषेक शेलार, कास पठार, कर्मचारी

०९पेट्री

जागतिक वारसास्थळ कास पठारावर सातारी तुऱ्याचे दर्शन.( छाया : सागर चव्हाण)

Web Title: Sataritura blossomed on Cas Plateau during lockdown!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.