सातारकर नागरिकच पोलिसांच्या भूमिकेत, वाहनचालक त्रस्त, मालट्रक... वाहनांसाठी गतिरोधक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2017 12:08 PM2017-12-07T12:08:37+5:302017-12-07T12:19:01+5:30
सातारकर नागरिकांना ट्रॅफिकजामचा फारसा अनुभवच नसतो. इनमिन तीन रस्ते अन् वाहनेही कमी. त्यामुळे काही मिनिटांत इच्छित ठिकाणी पोहोचले जाते; पण अलीकडे मालवाहू ट्रक रहदारीच्या ठिकाणी कित्येक तास थांबत असल्याने नवीनच समस्या उद्भवू लागल्या आहेत. दोन मिनिटांच्या अंतरावर जाण्यासाठी अर्धा तास थांबावे लागत आहे.
सातारा : सातारकर नागरिकांना ट्रॅफिक जामचा फारसा अनुभवच नसतो. इनमिन तीन रस्ते अन् वाहनेही कमी. त्यामुळे काही मिनिटांत इच्छित ठिकाणी पोहोचले जाते; पण अलीकडे मालवाहू ट्रक रहदारीच्या ठिकाणी कित्येक तास थांबत असल्याने नवीनच समस्या उद्भवू लागल्या आहेत. दोन मिनिटांच्या अंतरावर जाण्यासाठी अर्धा तास थांबावे लागत आहे.
साताऱ्यातील वाहतूक हा एक अभ्यासाचाच विषय बनला आहे. वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी केएमएम प्रसन्ना पोलिस अधीक्षक असताना सम-विषम पार्किंग सुविधा सुरू झाली. एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली. यामुळे काहीसा चांगला परिणाम दिसत असतानाच वाहनचालक शिस्त मोडताना दिसत आहेत.
मोती चौक ते पाचशे एक पाटी चौक दरम्यानचा अरुंद रस्ता आहे. याच रस्त्यावर जागोजागी विक्रेते रस्त्यावर स्टॉल लावून बसलेले असतात. तेथेच हातगाडेवाले थांबलेले असतात. त्यामुळे वाहतुकीची मोठी कोंडी होत असते. त्यात एसटी निघाली असल्यास लांबपर्यंत रांगा लागलेल्या असतात.
या वाहतुकीला कंटाळलेले वाहनचालक पर्यायी मार्ग म्हणून स्टेट बँकेपासून जुना मोटारस्टँडमार्गे जातात. या रस्त्याचा वापर करणाऱ्यांचे प्रमाणही वाढले आहे. परंतु या मार्गावरही मालवाहू ट्रक साहित्य उतरविण्यासाठी रस्त्यावर थांबलेले असतात.
त्यातच रस्त्याच्या कडेला काही गाड्या अस्ताव्यस्त लावलेल्या असल्याने दोन्ही बाजूंनी वाहतूक थांबते. त्यामुळे काही मीटरचा रस्ता ओलांडण्यासाठी अर्धा तास उशीर होत आहे. विशेष म्हणजे या रस्त्यापासूनच काही अंतरावर एक पोलिस चौकी आहे. परंत कोणीही मदतीला येत नाही.
व्यापाऱ्यांची रस्त्यावरच दुकानदारी
या रस्त्याच्या कडेला दुकाने असलेले व्यावसायिक केरसुणी, झाप, टोपली, झाडू, पतंग, पेपर डिश विकण्यासाठी रस्त्यावर मांडून रस्ता अडवत आहेत. त्यामुळे पादचाऱ्यांना चालत जाणेही अवघड जात आहे.
सातारा पालिका व पोलिसांनी या मार्गावरील अतिक्रमण दूर करावे. तसेच या मार्गावर अवजड वाहने उभी करण्यासाठी मज्जाव करावा. तसेच त्या वाहनांसाठी ठराविक वेळ ठरवून द्यावी, अशी मागणी होत आहे.