Zero Shadow Day: सातारकरांनी अनुभवला खेळ ‘सावली’चा!
By सचिन काकडे | Updated: May 10, 2024 17:33 IST2024-05-10T17:27:49+5:302024-05-10T17:33:28+5:30
सातारा : सावली आपली साथ सोडत नाही असं म्हटलं जात असलं तरी असं खरंच घडू शकतं. याचा अनुभव शुक्रवारी ...

Zero Shadow Day: सातारकरांनी अनुभवला खेळ ‘सावली’चा!
सातारा : सावली आपली साथ सोडत नाही असं म्हटलं जात असलं तरी असं खरंच घडू शकतं. याचा अनुभव शुक्रवारी सातारकरांना आला. निमित्त होते शून्य सावली दिवसाचे. दुपारी १२ ते १२.३० या वेळेत सातारकरांनी रस्त्यावर, अंगणात तसेच इमारतीच्या छतावर सूर्य निरिक्षण करुन आपली सावली सरळ रेषेत पायाखाली स्थिरावल्याचा अनुभव घेतला. या खगोलीय चमत्काराचा अनुभव घेताना आबालवृद्धांमध्ये कुतूहल दिसून आले.
शून्य सावली दिवस म्हणजेच झीरो शॅडो डे. या खगोलीय चमत्काराची नागरिकांसह विद्यार्थ्यांना उत्सुकता लागली होती. ही उत्सुकता शुक्रवारी संपली अन् नागरिकांनी सावली आपली साथ कशी सोडते, याचा प्रात्यक्षिकासह अनुभव घेतला. दुपारी बारा वाजता सूर्य माथ्यावर आल्यानंतर नागरिक घराबाहेर पडले. कोणी इमारतीच्या गच्चीवर तर कोणी मोकळ्या मैदानात येऊन शून्य सावली दिवसाचा अनुभव घेतला. दुकानदार तसेच व्यावसायिकांनीदेखील हा प्रयोग करून पाहिला. अनेकांना काही वेळासाठी आपली सावली केवळ पायाखाली स्थिरावल्याचे दिसले.
या दिवसाची आठवण म्हणून तरुणांनी सावली शून्य झाल्याने फोटोही आपल्या कॅमेऱ्यात कैद केले. सातारकरांना शनिवारी देखील या खगोलीय चमत्काराचा अनुभव घेता येईल, अशी माहिती खगोल अभ्यासकांनी दिली