सातारकरांनी अनुभवला खेळ सावलीचा झिरो शॅडो डे : निसर्गाचा अद्भूत चमत्कार पाहून अनेकजण भारावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2018 12:15 AM2018-05-11T00:15:26+5:302018-05-11T00:15:26+5:30
सातारा : सावली मनुष्याची साथ कधीच सोडत नाही, असं म्हटलं जातं. मात्र, असं खरंच घडू शकतं, याचा अनुभव गुरुवारी (दि. १०) सातारकरांना आला.
सातारा : सावली मनुष्याची साथ कधीच सोडत नाही, असं म्हटलं जातं. मात्र, असं खरंच घडू शकतं, याचा अनुभव गुरुवारी (दि. १०) सातारकरांना आला. दुपारी बारनंतर काही काळ सावली गायब झाल्याने सातारकरांनी पाहिले. ‘शून्य सावली दिनानिमित्त’ निसर्गाचा हा अद्भूत अविष्कार पाहून अनेकांनी कुतूहल व्यक्त केले.
पृथ्वीवर मकर वृत्ताच्या दक्षिणेकडील भागात तर कर्कवृत्ताच्या उत्तरेकडच्या भागात सूर्य कधीही डोक्यावर येत नाही. तो सदैव क्रमश: उत्तरेकडे किंवा दक्षिणेकडेच दिसतो. परंतु, या दोन टोकांच्या वृत्तामधल्या लोकांना वर्षातून दोनदा सूर्य
बरोबर डोक्यावर आलेला अनुभवायला मिळतो. जेव्हा सूर्य बरोबर डोक्यावर असतो तेव्हा आपली सावली सरळ आपल्या पायाखाली पडते. जणूकाही सावली दिसेनाशी झाली असा काहीवेळ भास होतो. यालाच ‘शून्य सावली दिवस’ असे म्हटले जाते.
आपली किंवा कोणत्याही वस्तूची सावली ही अगदी बरोबर आपल्या पायांच्या किंवा त्या वस्तूच्या खाली लपते आणि त्यामुळे ती दिसत नाही. गेल्या काही दिवसांपासून सातारकरांना या दिवसाची उत्सुकता लागून राहिली होती. अखेर गुरुवारी आबालवृद्धांची निसर्गाच्या या अविष्काराचा अनुभव घेतला. सातारा
शहरात गुरुवारी दुपारी बारानंतर नागरिक घराबाहेर पडले. यावेळी अनेकांनी कुतूहलाने आपली सावली शून्य झाली आहे की नाही, याचा अनुभव घेतला. काही दुकानदार व व्यावसायिकांनीही हा प्रयोग करून पाहिला. अनेकांना आपली सावली केवळ पायाखाली आल्याचे दिसले. या दिवसाची आठवण म्हणून युवक-युवतींनी सावली शून्य झाल्याचे फोटोही कॅमेऱ्यात कैद केले. सातारा शहरासह ग्रामीण भागातही अनेकांनी शून्य सावलीचा अनुभव घेतला.
वर्षातून एक दिवस सावली सोडते साथ
वर्षातून एक दिवस काही वेळासाठी का होईना सावली साथ सोडत असते. संपूर्ण पृथ्वीवर एकाच दिवशी शून्य सावली दिसते असे नाही. तर वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळ्या भागात हा अनुभव येत असतो. मे महिन्यातच शून्य सावली दिवसाचा अनुभव घेता येतो. हा सावलीचा खेळ म्हणजे एक खगोलीय चमत्कार आहे. असे दरवर्षीच घडत असते.
आपलीच सावली गायब होते, म्हणजे नक्की काय होते? याची काही दिवसांपासून उत्सुकता लागली होती. याचा अनुुभव आज प्रत्यक्षात आला. दुपारी बारानंतर जेव्हा उन्हात उभे राहिलो तेव्हा आपली सावली केवळ पायाखालीच पडल्याचे दिसले. निसर्गाचा हा चमत्कारच म्हणावा लागेल.
- प्रमोद जाधव, सातारा