सातारकर दिवसाला १३ मोबाईल हरवतात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 04:37 AM2021-02-12T04:37:43+5:302021-02-12T04:37:43+5:30

सातारा: शहरात गर्दीच्या ठिकाणी मोबाईल हरवण्याचे प्रकार वाढले असून, दिवसाला जवळपास १३ मोबाईल हरवत असल्याचे समोर आले आहे. यातील ...

Satarkar loses 13 mobiles a day | सातारकर दिवसाला १३ मोबाईल हरवतात

सातारकर दिवसाला १३ मोबाईल हरवतात

Next

सातारा: शहरात गर्दीच्या ठिकाणी मोबाईल हरवण्याचे प्रकार वाढले असून, दिवसाला जवळपास १३ मोबाईल हरवत असल्याचे समोर आले आहे. यातील काही जणांचे मोबाईल चोरीसही जात आहेत. मात्र, बहुतांशवेळा पोलीस गहाळ रजिस्टरला याची नोंद करत असल्यामुळे ही मोबाईल हरविण्याची आकडेवारी कमी दिसून येत आहे.

शहरात मोबाईल चोरीच्या घटनाही अलीकडे वाढत आहेत. दोन वर्षांपूर्वी शहरात मोबाईल चोरणाऱ्या टोळीने अक्षरश: धुडगूस घातला होता. रविवारपेठ भाजी मंडईमध्ये बाजाराच्या दिवशी तब्बल २० ते २५ मोबाईल चोरीस जात होते. शहर पोलिसांनी ही टोळी उदध्वस्त केली होती. त्यानंतर मात्र, काही दिवस मोबाईल चोरीस जाण्याचे प्रकार थांबले होते. परंतु पुन्हा या टोळ्या सक्रिय झाल्या आहेत. शहरात सातत्याने कुठे ना कुठे मोबाईल हरविण्याचे प्रकार घडत आहेत. परंतु पोलीस ठाण्यात आल्यानंतर क्राईम रेट वाढेल म्हणून पोलीस गहाळ रजिस्टरला याची नोंद करत असल्याचे पहायला मिळते. शहरात जवळपास दिवसाला १३ मोबाईल हरवत आहेत. महागडे मोबाईल चोरीस गेल्यानंतरच तक्रारदार पुढे येत आहेत. पण कमी किमतीचे मोबाईल चोरीस गेल्यानंतर अनेकजण मोबाईल पुन्हा आढळून येईल, याची आशा सोडून देतात.

२०२० मध्ये दाखल झालेल्या तक्रारी

जानेवारी १४

फेब्रुवारी ७

मार्च ८

एप्रिल ८

मे ९

जून ४

जुलै ३

ऑगस्ट ८

सप्टेंबर ९

ऑक्टोबर ५

नोव्हेंबर ९

डिसेंबर ४

चौकट : मंडईत जाताय...मोबाईल सांभाळा

मोबाईल चोरट्यांसाठी गर्दीचे सोयीचे ठिकाण म्हणजे भाजी मंडई. या ठिकाणी गर्दी होत असल्यामुळे चोरट्यांकडून याचा गैरफायदा उठवला जातो. भाजी खरेदी करत असताना वरच्या खिशातील मोबाईल हातोहात लांबविला जातो. तर भाजी घेताना खाली वाकल्यानंतर चुकून वरच्या खिशातील मोबाईल खाली पडतो. त्यावेळी नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे आहे. तसेच महिलांच्या पर्समध्येही यावेळी मोबाईल असतो. भाजी खरेदीच्या नादात पर्सची चेन काढून मोबाईल चोरीस गेल्याचे यापूर्वी प्रकार घडले आहेत. त्यामुळे महिलांनीही काळजी घेणे गरजेचे आहे.

चौकट : हरवले ५३..सापडले ३४

वर्षभरात चोरीस गेलेल्या मोबाईलची संख्या ५३ आहे. मात्र, यातील ३४ मोबाईलचा पोलिसांना शोध लागला आहे. अनेकवेळा मोबाईल चोरीस गेल्यानंतर तक्रारदार पुन्हा पोलीस ठाण्यात चौकशी करत नाहीत. त्यामुळे पोलिसांचा तपासही पेंडिंग राहतो. एखाद्या गुन्ह्यात मोबाईलचा गैरवापर होऊ नये म्हणून काहीजण तक्रार देतात. पुन्हा मोबाईल सापडेल, यासाठी मात्र, तक्रार देत नाहीत. हेच चोरट्यांच्या पथ्यावर पडत असल्याचे दिसून येत आहे.

चौकट : मोबाईलमुळे गुन्हा उघडकीस येतो..पण मोबाईल सापडत नाही

एखादा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी अनेकदा पोलीस मोबाईलचा वापर करतात. मोबाईलच्या लोकेशनवरून पोलीस गुन्हेगारांचा माग काढतात. पण एखाद्याचा मोबाईल चोरीस गेल्यानंतर गुन्हेगारांपर्यंत पोलीस का पोहोचत नाहीत, असा प्रश्न साहजिकच नागरिकांना पडत आहे. गुन्हा घडल्यानंतर पोलीस गांभीर्याने पाहतात पण मोबाईल हरविल्याच्या घटना किरकोळ समजून पोलीस याकडे दुर्लक्ष करतात.

Web Title: Satarkar loses 13 mobiles a day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.