सातारकर तरुणाई साकारतेय मंगळाई देवराई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:49 AM2021-06-16T04:49:56+5:302021-06-16T04:49:56+5:30
सातारा : धार्मिक भावनेतून पवित्र मानल्या गेलेल्या देवराईची भुरळ युवांनाही पडली आहे. सातारा शहरात अशीच एक देवराई अजिंक्यतारा किल्ल्याच्या ...
सातारा : धार्मिक भावनेतून पवित्र मानल्या गेलेल्या देवराईची भुरळ युवांनाही पडली आहे. सातारा शहरात अशीच एक देवराई अजिंक्यतारा किल्ल्याच्या उतारावर मंगळाईच्या नावाने साकारली जात आहे. या उपक्रमाचा प्रारंभ मोठ्या उत्साहात मान्यवरांच्या उपस्थितीत झाला. शहराच्या इतक्या जवळ देवराई तयार करण्याचा जिल्ह्यातील हा पहिला प्रयोग आहे.
या वेळी उपवन संरक्षक महादेव मोहिते, कन्हैय्यालाल राजपुरोहित, ड्रोंगोचे अध्यक्ष सुधीर सुकाळे, पंकज नागोरी, दी गार्डनरस ग्रुपचे कार्यकर्ते उपस्थित होते.
अजिंक्यतारा किल्ल्याच्या उतारावर, शाहूनगरजवळ ही देवराई तयार करण्यात येत आहे. यासाठी तरुणांचा मोठ्या प्रमाणात सहभाग असलेल्या ‘दी गार्डनस्’ या समूहाने पुढाकार घेतला आहे. सातारा शहरात नव्याने समाविष्ट झालेल्या अजिंक्यतारा किल्ल्यावर वृक्षसंवर्धनाला मोठा वाव आहे. पूर्वेच्या उताराच्या मध्यावर मंगळाई देवीचे मंदिर आहे. या मंदिराजवळ सुमारे १ एकर क्षेत्रात ही देवराई उभारण्यात येत आहे. देवराईमुळे वृक्ष संवर्धन व कुऱ्हाडबंदीला धार्मिक अधिष्ठान प्राप्त झाले आहे. देवराईमुळे मातीची सुपीकता तर वाढतेच, पण जमिनीखालच्या पाण्याचेही संवर्धन होते.
परदेशी झाडांचा पक्ष्यांना उपयोग होत नाही. त्यामुळे वड, उंबर, काटेसावर, कडूनिंब, बेल अशा सारख्या स्थानिक प्रजातींच्या वृक्षांची जोपासना करणार असल्याचे दी गार्डनस् ग्रुपचे अॅड. ॠषीकेश बहुलेकर यांनी सांगितले.
महाराष्ट्रातही सुमारे तीन हजार देवराया आहेत. काळूबाई, रानजाई, भैरोबा, विंझाई ,म्हसोबा, सोनजाई, आंबेश्वर अशा अनेक देवतांच्या नावाने त्या ओळखल्या जातात. सातारा जिल्ह्यात यातील काळूबाई, आरव, घाटाई आदी २९ देवरायांची नोंद आहे. याच पद्धतीची देवराई पहिल्या टप्प्यामध्ये छोट्या स्वरूपात मंगळाई मंदिर परिसरात उभारण्यात येत असल्याचे मानद वन्यजीव रक्षक सुनील भोईटे यांनी सांगितले.
चौकट :
कुऱ्हाडबंदीला धार्मिक अधिष्ठान
देवराई ही बहुधा देवळाभोवती असते. या देवरांयामध्ये झाडावरचे फूलही निसर्गत:च खाली पडल्याशिवाय देवाला वाहिले जात नाही. देवरायांच्या परिसरात वृक्षतोड, चराई यांनाही बंदी असते. देवराईतील झाड अथवा ओली फांदी जरी तोडल्यास देवीला ते चालत नाही, अशी ग्रामस्थांची धारणा आहे. त्यामुळे वृक्षसंवर्धन व कुऱ्हाडबंदीला धार्मिक अधिष्ठान आहे. देवराईमुळे मातीची सुपीकता तर वाढतेच, पण जमिनीखालच्या पाण्याचेही संवर्धन होते.
__________
कोट :
कास पठारालगत, साताऱ्यापासून सुमारे २५ किलोमीटर अंतरावर घाटाईचे देवस्थान आहे. या डोंगरावर एका छोट्या टेकडीवर सुमारे ५ हेक्टर क्षेत्रात ही देवराई घाटवण ग्रामस्थांनी प्रयत्नपूर्वक वाडवडिलांच्या काळापासून जपली आहे. याच पद्धतीची देवराई मंगळाई देवीच्या नावाने उभारण्याचा संकल्प आहे.
- अॅड. ऋषीकेश बहुलेकर, गार्डनस् ग्रुप, सातारा
फोटो आहे