सातारकर वापरू लागले स्वत:च स्वत:ची वीज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2017 12:00 AM2017-09-13T00:00:03+5:302017-09-13T00:00:03+5:30
सचिन काकडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : महाराष्ट्राला प्रकाशमान करणाºया कोयना धरणातून वीजनिर्मितीचे कार्य अखंडपणे सुरू आहे. कोयनेसह जिल्ह्यात अनेक लहान-मोठे वीजनिर्मिती प्रकल्पही आहेत. मात्र, नागरिकीकरण व वाढत्या लोकसंख्येमुळे विजेचा वापर वाढू लागला असून, वीजनिर्मितीची क्षमता अपुरी पडत चालली आहे. यावर उपाय म्हणून सातारकरांचा अपारंपरिक ऊर्जा स्त्रोत असलेल्या ‘सोलर नेट मिटरिंग’कडे कल वाढू लागला आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून नागरिक स्वत:च स्वत:ची वीज तयार करत आहेत व अधिकची वीज महावितरणला देऊन विजबिलापासून सुटका मिळवित आहेत.
सातारा जिल्ह्यात सौरऊर्जेपासून वीजनिर्मितीचा पहिला प्रकल्प छत्रपती शिवाजी कॉलेजमध्ये राबविण्यात आला. सौरऊर्जेचे महत्त्व ओळखून महाविद्यालयातील शिपायापासून ते प्राध्यापकापर्यंत सर्वांनी निधी गोळा केला व महाविद्यालयाच्या छतावर पाच किलो वॅट क्षमतेची ‘रूफ टॉप सोलर’ यंत्रणा बसवून घेतली. वीज वितरण कंपनीने नेट मिटरिंग प्रणाली मंजूूर केल्यानंतर याठिकाणी बाय डायरेक्शनल मीटर यशस्वीरित्या बसविण्यात आला. यानंतर ‘रूफ टॉप सोलर’मधून महिन्याला ६०० युनिट विजेची निर्मिती सुरू झाली.
ऊर्जेचा अपारंपरिक स्त्रोत असल्यामुळे शहरी व ग्रामीण भागातील नागरिक ‘सोलर नेट मिटरिंग’ला प्राधान्य देऊ लागले आहे. ज्या ठिकाणी वीज पोहचू शकत नाही, अशा दुर्गम भागातही ‘रूफ टॉप सोलर’ हा प्रकल्प फायदेशीर ठरत आहे. हा प्रकल्प थोडा खर्चिक असला तरी याचे फायदे दीर्घकाळ टिकणारे आहे. आजपर्यंत जिल्ह्यात महाविद्यालयासह वीसहून अधिक नागरिकांनी वीजनिर्मितीचा हा प्रकल्प कार्यान्वित करून वीजबिलापासून मुक्ती मिळविली आहे. सौर ऊर्जा वापरण्यास अत्यंत सोपी, कोणतेही प्रदूषण न करणारी व मुबलक प्रमाणात
वापरता येणारी असल्याने याच्या वापराकडे नागरिकांचा कल वाढू लागला आहे.
शासनाकडून जागृती अन् प्रकल्पासाठी अनुदान
एक किलो वॅट वीजनिर्मितीसाठी सुमारे ८५ हजार रुपये खर्च येतो. शासन यासाठी पर किलो वॅट सुमारे १८ हजार ३०० रुपये अनुदान देते. वीजनिर्मितीचे उपकरण घराच्या छतावर बसविण्यासाठी प्रारंभी वीज कंपनीकडे अर्ज करावा लागतो. यानंतर वीज वितरण कंपनीकडून बाय डायरेक्शलन नेटमीटर बसविला जातो. या माध्यमातून सौरऊर्जा व वीज कंपनीची वीज यांचा हिशोब ठेवला जातो.
इलेक्ट्रिक उपकरणेही सुसाट
महावितरणच्या वीजेवर घरातील सर्वप्रकारची इलेक्ट्रिक उपकरणे ज्या प्रमाणे चालतात त्याचप्रमाणे ‘रूफ टॉप सोलर’च्या माध्यमातून होणाºया वीजनिर्मितीवरही टीव्ही, पंखा, एसी, फ्रीज, इस्त्री यांसारखी सर्व उपकरणे चालू शकतात. मात्र, आपण किती युनिट विजेची निर्मिती करीत आहोत. यावर उपकरणांचा वापर अवलंबून आहे.
पावसाळ्यातही बिल झिरो
ग्राहकाने पावसाळ्यात दोन महिने महावितरणची वीज वापरली तरी महावितरणकडून येणारे बिल हे नगण्य असते. सौरऊर्जेवर तयार होणारी अधिकची वीज महावितरण वापरते. त्यामुळे जे काही बिल येईल त्या बिलाचे पैसे युनिटच्या दरानुसार महावितरणकडून वजा केले जातात. व ग्राहकाला निर्धारित केलेली रक्कम बिलाच्या स्वरूपात भरावी लागते.
नेट मिटरिंग सिस्टीम म्हणजे काय
नेट मिटरिंगमध्ये इन्वर्टर, ट्रान्सफार्मर आणि विद्युत मीटर यांच्या साह्याने घराच्या छतावर सोलर पॅनेल्स लावले जातात. पॅनेल्सच्या माध्यमातून वीजनिर्मिती होते. जर एका सौर प्रकल्पाद्वारे दोनशे युनिट वीजनिर्मिती होत असेल आणि घरगुती वीज वापर १५० युनिट असेल तर उर्वरित ५० युनिट वीज महावितरणला घेता येते. महावितरणने युनिटचे दर ठरवून दिले आहेत. त्यानुसार महावितरण ग्राहकाच्या वीजबिलात कपात करते.