श्वानांच्या आकस्मित मृत्यूने सातारकर हबकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 04:45 AM2021-08-13T04:45:06+5:302021-08-13T04:45:06+5:30

सातारा : सातारा शहरातील भटक्या श्वानांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली असताना आळूचा खड्डा परिसरात चार श्वानांचा आकस्मिक मृत्यू झाल्याने ...

Satarkar was shocked by the sudden death of dogs | श्वानांच्या आकस्मित मृत्यूने सातारकर हबकले

श्वानांच्या आकस्मित मृत्यूने सातारकर हबकले

Next

सातारा : सातारा शहरातील भटक्या श्वानांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली असताना आळूचा खड्डा परिसरात चार श्वानांचा आकस्मिक मृत्यू झाल्याने सातारकर हबकले. पालिकेकडून या श्वानांची तातडीने विल्हेवाट लावण्यात आली असली तरी या श्वानांचा विषारी पदार्थ खाल्ल्याने मृत्यू झाला की त्यांना कोणी मारले? अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू झाली आहे.

सातारा शहरात भटक्या श्वानांचा विषय नेहमीच चर्चेचा ठरत आलेला आहे. गल्लोगल्ली श्वानांची संख्या वाढल्याने नागरिक तसेच वाहनधारक अक्षरशः हैराण झाले आहेत. या श्वानांचा पालिकेने तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांमधून वारंवार करण्यात आली आहे. या मागणीची दखल घेत पालिकेकडून येत्या काही दिवसात भटक्या श्वानांच्या निर्बिजीकरणाची मोहीम हाती घेतली जाणार आहे.

दरम्यान, राजवाडाजवळील आळूचा खड्डा परिसरात अचानक तीन श्वान मृत्यूमुखी होऊन पडल्याची माहिती पालिकेचे आरोग्य निरीक्षक शैलेश अष्टेकर यांना मिळाली. त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. कर्मचाऱ्यांच्या मदतीने या श्वानांना डंपरमधून सोनगाव डेपोत नेण्यात आले. येथे रात्री उशिरा या श्वानांना दफन करण्यात आले. त्यानंतर पुन्हा एकदा याचठिकाणी एक श्वान मृत्यूमुखी पडल्याची माहिती आरोग्य विभागाला मिळाली. या श्वानालाही डेपोत दफन करण्यात आले. सातारा शहरात भटक्या श्वानांचा अशाप्रकारे मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली. या श्वानांनी काहीतरी खाल्ले असावे अथवा कोणीतरी त्यांना विषारी पदार्थ खायला दिला असावा, अशी चर्चा आता सुरू झाली आहे.

(चौकट)

‘त्या’ अफवेने उडवली अधिकाऱ्यांची झोप

आळूचा खड्डा परिसरात तब्बल ४० श्वान मृत्यूमुखी पडल्याची माहिती सर्वत्र वाऱ्यासारखी पसरली. सोशल मीडियावरदेखील हे वृत्त वेगाने पसरले. आरोग्य विभागाला जेव्हा ही माहिती मिळाली तेव्हा अधिकारी व कर्मचाऱ्यांची अक्षरशः झोपच उडाली. प्रत्यक्षात चार श्वानांचा मृत्यू झाला असताना कोणीतरी ४० श्वान मृत्यूमुखी पडल्याची अफवा पसरविल्याने आरोग्य विभागाला याचा मोठा मनस्ताप सहन करावा लागला.

Web Title: Satarkar was shocked by the sudden death of dogs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.