बेळगाव संमेलनात सातारकराचा प्रयोग
By Admin | Published: February 3, 2015 09:21 PM2015-02-03T21:21:07+5:302015-02-03T23:57:23+5:30
अभय देवरे यांच्या ‘गंमतगप्पा’चे सादरीकरण
सातारा : बेळगाव येथील नाट्य संमेलनात प्रयोग सादर करण्याची संधी सातारा येथील अभिनेते अभय देवरे यांना लाभली आहे. त्यांचा ‘गंमतगप्पा’ हा विनोदी एकपात्री कार्यक्रम बेळगावात सादर होणार आहे. नाट्य संमेलनात सादरीकरणाची संधी लाभलेले ते एकमेव सातारकर आहेत.कथा, कविता, वात्रटिका, रंजक, बहारदार किस्से, विविध विषयांवरील गप्पा असे ‘गंमतगप्पा’ कार्यक्रमाचे स्वरूप आहे. आजवर या कार्यक्रमाचे शेकडो प्रयोग देवरे यांनी वेगवेगळ््या शहरांत केले आहेत. मर्यादित वेळेत विविध विषयांना स्पर्श करण्याचे त्यांचे कसब मान्यवरांनी गौरविले आहे. ‘जातककथा’ या दूरदर्शन मालिकेत, तसेच समर्थ रामदासस्वामी, मनोगत, रंगराव चौधरी, भरारी या चित्रपटांत देवरे यांनी भूमिका केल्या आहेत. ‘मराठी विवाह’ या विषयावर त्यांनी लघुपटाची निर्मिती केली आहे. कथाकथन, वक्तृत्व आणि एकपात्री स्पर्धांमधून त्यांना अनेक पारितोषिके मिळाली आहेत. कथाकथन कलेच्या प्रसारासाठी ‘कथाकथनातून बालविकास’ या विषयावर त्यांनी भाषणेही केली आहेत. मे २०१० मध्ये अमेरिकेतील न्यू जर्सी येथे झालेल्या पहिल्या विश्व मराठी नाट्यसंमेलनात सातारची ‘मी गुलाबबाई’ ही एकांकिका सादर झाली होती. देवरे यांनी या एकांकिकेचे दिग्दर्शन आणि त्यात भूमिकाही केली. (प्रतिनिधी)