सातारकरांची हुडहुडी जाईना...पारा १० अंशावर : महाबळेश्वरातही थंडी कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 05:35 PM2020-12-23T17:35:02+5:302020-12-23T17:36:47+5:30
Mahabaleshwar Hill Station Satara WinterNews- सातारा जिल्ह्यात मागील तीन दिवसांपासून थंडी कायम असून साताऱ्यात बुधवारी १०.०१ अंशाची नोंद झाली. त्यामुळे सातारकरांची हुडहुडी अजुनही जाता जाईना. तर महाबळेश्वरातही थंडी कायम आहे. ग्रामीण भागात थंडीपासून बचावासाठी शेकोट्या पेटविण्यात येत आहेत.
सातारा : जिल्ह्यात मागील तीन दिवसांपासून थंडी कायम असून साताऱ्यात बुधवारी १०.०१ अंशाची नोंद झाली. त्यामुळे सातारकरांची हुडहुडी अजुनही जाता जाईना. तर महाबळेश्वरातही थंडी कायम आहे. ग्रामीण भागात थंडीपासून बचावासाठी शेकोट्या पेटविण्यात येत आहेत.
जिल्ह्यात मागील महिन्यापासून थंडीला सुरूवात झाली. मात्र, यावर्षी किमान तापमानात सतत चढ-उतार होत आला आहे. कधी किमान तापमान १५ अंशाच्या खाली येते. तर काहीवेळा २० अंशावरही पोहोचते. त्यातच ढगाळ वातावरणाचाही अनुभव घ्यावा लागतो. त्यामुळे सातारकरांना विविध हवामानाशी सामना करावा लागत आहे.
काही दिवसांपूर्वी तर साताऱ्याचे किमान तापमान २० अंशापर्यंत पोहोचले होते. त्यानंतर हळू-हळू तापमानात उतार आला. आता तर साताºयातील किमान तापमान ९ अंशापर्यंत खाली आलेले आहे. २० डिसेंबर रोजी साताऱ्यात १४.०८ अंश तापमानाची नोंद झालेली. तर सोमवारी १२.०१ अंश तापमान नोंदले गेले.
यावर्षातील साताऱ्यातील हे नीच्चांकी तापमान ठरले होते. मात्र, मंगळवार दोन वर्षांतील नीच्चांकी तापमान ठरले. कारण, साताऱ्यातील किमान तापमान ९ अंशापर्यंत खाली आले होते. यामुळे हुडहुडी भरुन राहिली. मात्र, बुधवारी तापमानात काहीशी वाढ झाली. १०.०१ अंशाची नोंद झाली. तरीही थंडी कायम आहे.
महाबळेश्वरमध्येही थंडीचा जोर कायम आहे. मागील काही दिवसांपासून महाबळेश्वरात आलेले पर्यटक गुलाबी थंडीचा आनंद लुटत आहेत. महाबळेश्वरमध्ये मंगळवारी ११.०३ अंशाची नोंद झाली.तर बुधवारी किमान तापमान १२ अंशावर गेले होते.
दरम्यान, किमान तापमान कमी झाल्याने थंडीने जोर धरला आहे. यामुळे बाजारपेठेसह शेतीच्या कामावरही परिणाम झाला आहे. तर ग्रामीण भागात विजेचे भारनियमन आहे. त्यामुळे वीज उपलब्धतेनुसार शेतकऱ्यांना रात्रीच्या थंडीतही पिकांना पाणी देण्यासाठी जावे लागत आहे.
सातारा शहरातील किमान तापमान...
दि. १४ डिसेंबर १९.०७, दि. १५ डिसेंबर १७.०२, दि. १६ डिसेंबर १६.०४, दि. १७ डिसेंबर १६.०९, दि. १८ डिसेंबर १५.०३, दि. १९ डिसेंबर १६.०३, दि. २० डिसेंबर १४.०८, २१ डिसेंबर १२.०१, दि. २२ डिसेंबर ९ आणि २३ डिसेंबर १०.०१.